प्रकाश आंबेडकर यांची खळबळजनक टीका
मुंबई : देशाचा मतदार हाच देशाचा मालक आहे. 2024 मध्ये बिगर भाजपा-आरएसएसचे सरकार येऊ द्या. नरेंद्र मोदी आणि अमित शहांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैवाने या देशाचा मालक असलेला मतदार भीतीपोटी नोकर झालाय आणि नोकर मालक झालाय, अशी परिस्थिती आहे. आगामी कालावधीत ही भीती आपल्याला दूर करायची आहे. आज या सभेच्या ठिकाणी एवढ्या प्रचंड संख्येने आपण जमलो आहोत. जर याचठिकाणी बीबीसीचा वृत्तपट आपण दाखवला असता तर सर्वांनाच पोलिस पकडू शकतील का? जर पकडले तरी एवढ्या लोकांना ठेवायला तुरुंगात जागा आहे का? झुकाने वाला चाहीये, सरकार झुकती है, असे सांगत 2024 मध्ये यांना झुकवा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. पुण्यातील खडकवासला येथे आयोजित केलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेत ते बोलत होते.
नरेंद्र मोदी यांची वृत्ती त्या दारूड्याप्रमाणे
माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या काळात देशातील सोनं बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण ठेवले होते. मी अनेकवेळा विचारलं ते सोनं परत आणलं का? पण त्यावर कुणी उत्तर देत नाही. यावरुन देशाची परिस्थिती काय आहे ते बघा. आपल्या घरातलं सोनं जेव्हा आपण गहाण ठेवतो आणि ते सोडवता येत नाही. त्यावरुन आपले घर आर्थिकदृष्ट्या दुबळे असल्याचा निष्कर्ष काढला जातो. एखादा दारूडा अशावेळी घरातली भांडीकुंडी विकून घर चालवतो. सगळं विकून झालं की दारूडा आपलं घरही विकून टाकतो. आज नरेंद्र मोदी नेमके तेच करतायत की नाही सांगा? असा प्रश्न उपस्थित करत प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली.
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे मात्र कौतुक केले. नेहरू यांनी अत्यंत कष्टाने देश उभा केला असे सांगताना ते म्हणाले की, डॉ. होमी भाभा यांच्या संशोधनाच्या आधारावर नेहरूंनी देशात कारखाने उभे केले. तेच कारखाने आज भारताचा आर्थिक कणा आहेत. मात्र तेच कारखाने मोदी दारूड्यासारखा विकायला लागला आहे, अशी जळजळीत टीका आंबडेकर यांनी केली.
Belgaum Varta Belgaum Varta