नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या लंडनमध्ये आहेत. तिथून ते विविध वक्तव्यं करत आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी चीनचं कौतुक केलं होतं आणि मोदींवर टीका केली होती. आता पुन्हा एकदा राहुल गांधी चर्चेत आहेत कारण त्यांचं नवं वक्तव्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मुस्लीम ब्रदरहूड हे दोन्ही सारखेच आहेत असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर विहिंपने टीका केली आहे.
काय म्हटलं आहे राहुल गांधी यांनी?
ब्रिटन दौर्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. भाजपानंतर आणि नरेंद्र मोदींनंतर आता राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केलं आहे. इजिप्तमधली कट्टर संघटना मुस्लीम ब्रदरहुडसोबत राहुल गांधींनी संघाची तुलना केली आहे. संघाची स्थापन अशा पद्धतीने करण्यात आली आहे जशा पद्धतीने इजिप्तमध्ये मुस्लीम ब्रदरहूड स्थापन झालं होतं. लंडनमधल्या थिंक टँक चॅथम हाऊसमध्ये सुरू असलेल्या चर्चेत त्यांनी हे उदाहरण दिलं आहे. आरएसएस ही कट्टर आणि फॅसिस्टवादी संघटना आहे. या संघटनेने भारतातल्या काही संस्थांवरही कब्जा केला आहे. ज्याप्रमाणे इजिप्तमध्ये मुस्लीम ब्रदरहूड आहे त्याप्रमाणे भारतात आरएसएस आहे. भारतात या संघटनेकडून असा प्रचार केला जातो आहे की भाजपाला कुणी हरवू शकत नाही.
काय आहे मुस्लीम ब्रदरहूड ही संघटना?
इजिप्तमध्ये 1928 मध्ये सुन्नी नेता हसन अल बन्नाने इस्लामी देशाची मागणी करण्यासाठी मुस्लीम ब्रदरहूड ही संघटना स्थापन केली. बन्ना इजिप्तच्या एका शाळेत शिक्षक होते आणि ते इमामही होते. त्यावेळी बन्ना यांनी राजेशाही शासनाच्या समोर अर्थव्यवस्था आणि समाजाचं इस्लामीकरण हे केलं जावं याची मागणी केली. मात्र त्यांचा प्रस्ताव धुडकावण्यात आला. सरकारने त्यांची मागणी धुडकावल्यानंतर हिज्ब इल इखवान अल मुस्लिमीन यांच्या मदतीने इजिप्तमध्ये एक चळवळ चालवली गेली. या चळवळीचा उद्देशच हा होता की कुराण आपला कायदा आहे हे लोकांना समजावं. तसंच जिहाद हाच आपला मार्ग आहे असंही या चळवळीत ध्वनित केलं गेलं. त्यानंतर मुस्लिम ब्रदरहूडची स्थापना झाली. 1940 मध्ये या संघटनेसोबत 5 लाख लोक जोडले गेल. इस्रायल सोबत युद्ध पुकारलं गेल्यानंतर मुस्लिम ब्रदरहूडने पॅलेस्टाईनचा पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं. एवढंच नाही इजिप्तमध्ये अंतर्गत युद्ध सुरू करण्यामागेही मुस्लीम ब्रदरहूडच आहे. यानंतर सरकारने अॅक्शन मोड मध्ये येत या संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. तसंच शेकडो कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकलं.
विहिंपची राहुल गांधींवर टीका
राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर विश्व हिंदू परिषदेने राहुल गांधींवर टीका केली आहे. महामंत्री सुरेंद्र जैन यांनी म्हटलं आहे की राहुल गांधी हे आपल्या स्वार्थासाठी देशाचे तुकडे करू इच्छित आहेत. राहुल गांधी यांचं वर्तन हे एखाद्या टूलकिट प्रमाणे आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राष्ट्रभक्त आहेत. त्यांची तुलना मुस्लीम ब्रदरहुडशी करणं पूर्णपणे चुकीचं आहे असंही सुरेंद्र जैन यांनी म्हटलं आहे.
Belgaum Varta Belgaum Varta