नवी दिल्ली : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा राजीनामा सोमवारी राष्ट्रपतींनी स्वीकारला. याबाबत माहिती देताना गृह मंत्रालयाने सांगितले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सूचनेनुसार दिल्ली सरकारच्या मंत्रिपदाचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे. दुसरीकडे, सीबीआयनंतर आता ईडीकडूनही सिसोदिया यांची चौकशी करण्यात येत आहे. ईडीने सिसोदिया यांची चौकशी करण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी घेतली होती, त्यानंतर ईडीचे पथक तिहार तुरुंगात पोहोचले आणि सिसोदिया यांची चौकशी सुरू केली.
दिल्लीतील अबकारी धोरण घोटाळा प्रकरणी अटेक असलेले माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी 28 फेब्रुवारी रोजी सर्व खात्यांचा राजीनामा दिला होता. दरम्यान, राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. सिसोदिया यांना दिल्लीतील अबकारी धोरण घोटाळा प्रकरणात 26 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. 28 फेब्रुवारी रोजी मनीष सिसोदिया आणि यापूर्वीच अटकेत असलेले सत्येंद्र जैन यांनी आपल्या मंत्री पदांचा राजीनामा दिला होता.
सिसोदिया यांच्यासोबतच कायदा आणि आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांचाही राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे. सत्येंद्र जैन हे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी प्रदीर्घ काळापासून तिहार तुरुंगात आहेत. सिसोदिया यांच्यासोबत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दोघांचे राजीनामे एलजीकडे पाठवले होते. एलजी यांनी दोघांचे राजीनामे स्वीकारले होते. आता राष्ट्रपतींनीही दोघांचे राजीनामे स्वीकारले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta