पटणा : ईडीने राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या मुली आणि तेजस्वी यादव यांच्या घरी छापेमारी केली आहे. या छापेमारीत मोठे घबाड जप्त करण्यात आले आहे. नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ही छापेमारी केली आहे.
यादव यांचा धाकटा मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह लालूंच्या तीन मुलींकडून ७० लाखांची रोकड जप्त केली. २ किलोपेक्षा जास्त सोने आणि ९०० अमेरिकन डॉलर जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या सोन्यात १.५० किलो दागिने आहेत, तर ५४० ग्रॅम सोन्याचे नाणे आहे.
ईडी अधिकाऱ्यांनी हिन्दुस्तान टाइम्सला सांगितले, दिल्ली-एनसीआर, बिहार आणि झारखंडमधील एकूण २४ ठिकाणी छापे टाकण्यात आले. तेजस्वी यादव यांच्याशिवाय लालूंच्या तीन मुली रागिणी यादव, चंदा यादव आणि हेमा यादव यांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले. पाटण्यात लालू यादव यांचे निकटवर्तीय असलेले राजद नेते अबू दुजाना यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे.
दरम्यान लालूप्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी केंद्र सरकारवर कुटुंबाला त्रास देण्याचा आरोप केला आहे. लालूंच्या लेकीने एकापाठोपाठ ट्विट करत केवळ लालू यांच्या कुटुंबीयांना मजबूर करण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप रोहिणी यांनी केला.
Belgaum Varta Belgaum Varta