नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळं चांगलच वातावरण तापलं आहे. यावरुन शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दैवतांचा अपमान आम्ही सहन करणार नसल्याचे शिवसेनेच्या ठाकरे गटानं म्हटलं आहे. दरम्यान, काल (27 मार्च) दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीपासून दूर राहून शिवसेनेनं दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न यशस्वी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. विरोधी पक्षांच्या बैठकीत राहुल गांधींनी आता सावरकरांवर वादग्रस्त बोलणार नसल्याचे संकेत दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
भाजपचा सामना करायचा असेल तर आपसात मतभेद असून चालणार नाहीत
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेलं वक्तव्य आणि त्यावर शिवसेनेच्या भूमिकेचा उल्लेख केला होता. भाजपला दूर करायचे असेल तर विरोधी पक्षांमध्ये फूट पडायला नको ही भूमिका कालच्या बैठकीत घेण्यात आली. सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळं शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळं राज्यात महाविकास आघाडीत फूट पडेल का? अशा प्रकारची चर्चा देखील सुरु झाली होती. पण यापुढे राहुल गांधी सावरकर यांच्यावर वादग्रस्त बोलणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
शिवसेनेचा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न
अदानी प्रकरण आणि राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्याचाय मुद्यावरुन काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी 18 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी काल रात्री बैठक झाली. या बैठकीत सर्व पक्षांनी भाजपविरोधी एकत्र येऊन कसं लढता येईल तसेच रणनिती काय असावी यावर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यामुळं या बैठकीला हजेरी न लावता शिवसेनेने एका प्रकारे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
Belgaum Varta Belgaum Varta