बंगळुरू : कर्नाटकात आम्ही तुम्हाला स्वच्छ आणि भ्रष्टाचार मुक्त सरकार देऊ, अशी ग्वाही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली. विधानसभा निवडणुकीत आम्ही तुम्हाला ५ वचने दिली होती. आम्ही खोटी आश्वासने देत नाही. कर्नाटक सरकारची पहिली कॅबिनेट बैठक होईल. त्या बैठकीत ५ आश्वासनांची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी आश्वस्त केले.
बंगळूर येथील कंठिरवा स्टेडियमवर कर्नाटकाचे ३२ वे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार यांनी आज (दि.२०) दुपारी १२.३० वाजता शपथ घेतली. या शपथविधी समारंभानंतर ते बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले की, मी कर्नाटकातील जनतेचे मनापासून आभार मानतो. या विजयाचे एकमेव कारण म्हणजे काँग्रेस पक्ष कर्नाटकातील गरीब, दुर्बल, मागास, दलित, आदिवासी समाजाच्या पाठीशी उभा राहिला. आमच्याकडे प्रामाणिक आणि गरीब लोक होते. तर भाजपकडे पैसा, सत्ता, यंत्रणा सर्वकाही होते. परंतु भाजपला कर्नाटकच्या जनतेने पराभूत केले. त्यांच्या भ्रष्टाचाराचा पराभव केला, त्यांच्या द्वेषाचा पराभव केला. कर्नाटकाने द्वेषाच्या बाजारात लाखो प्रेमाची दुकाने उघडली आहेत, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Belgaum Varta Belgaum Varta