मणिपूर : मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये सोमवारी (दि. 22) पुन्हा हिंसाचार उसळला. यानंतर भारतीय लष्कर आणि सशस्त्र दलांना येथे परत बोलावण्यात आले आहे. राजधानीच्या न्यू चेकॉन भागात स्थानिक बाजारपेठेत जागेवरून मेईतेई आणि कुकी समुदायाच्या सदस्यांमध्ये जोरदार वाद झाला आणि त्यानंतर जाळपोळीच्या घटना घडल्या. तणावाची परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने तत्काळ 144 कलम लागू करत संचारबंदीची घोषणा केली. दुपारी 4 वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आल्याचे वृत्त आहे.
मणिपूरमध्ये कधीपासून हिंसाचार होत आहे?
या महिन्याच्या सुरुवातीपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. त्यानंतर आदिवासींनी बिगर आदिवासी मीतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या निषेधार्थ 3 मे रोजी एकता मोर्चा काढला. यानंतर राज्यात एका आठवड्यापेक्षा जास्त काळ हिंसक संघर्ष झाला, ज्यामध्ये 70 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. हिंसक चकमकींनंतर हजारो नागरिकांना विस्थापित व्हावे लागले. अखेर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले.