रांची : आपण एखाद्या महिलेने जुळ्या किंवा तिळ्या मुलांना जन्म दिल्याचे ऐकले आहे. मात्र, एखाद्या महिलेने एकाच वेळी 5 मुलांना जन्म दिला अशी कल्पनाही केली नसेल. मात्र, हे वास्तवात घडले आहे. झारखंडच्या रांची येथे सोमवारी एका महिलेने चक्क 5 मुलांना जन्म दिला आहे. त्यामुळे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
झारखंडच्या रांची येथील आरआयएमएस येथे अशी दुर्मिळ प्रसुती झाली आहे. प्रसुतीनंतर आई आणि बाळांची प्रकृती उत्तम आहे. मात्र पाचही बाळे निरोगी असली तरी त्यांचे वजन कमी असल्याने त्यांना नवजात अतिदक्षता विभागात निरीक्षणासाठी ठेवण्यात आले आहे.
आरआयएमएस रांचीने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले, “चतर येथील एका महिलेने आरआयएमएस मधील प्रसूती आणि स्त्रीरोग विभागात पाच मुलांना जन्म दिला आहे. बाळांना एनआयसीयुमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. डॉ शशी बाला सिंह त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी प्रसूती झाली.” दरम्यान, डॉक्टरांचे एक पथक बाळांवर लक्ष ठेवून आहे.
Belgaum Varta Belgaum Varta