नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या प्रवासातील मोदी सरकारचं यश सांगण्याची जबाबदारी आता केंद्रीय मंत्र्यांवर देण्यात आली आहे. सोमवारी (29 मे) केंद्रीय मंत्री देशभरात एकाच वेळी पत्रकार परिषद घेणार आहेत. या दरम्यान देशातील प्रत्येक राज्याच्या राजधान्यांमध्ये केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.
जेथे भाजपचे सरकार असेल तिथे केंद्रीय मंत्री त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह पत्रकार परिषद घेतील आणि जिथे भाजपचं सरकार नसेल तिथे केंद्रीय मंत्री पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसह माध्यमांना संबोधित करतील. यावेळी मोदी सरकारच्या गेल्या 9 वर्षातील सर्व कामगिरीवर आधारित सादरीकरणही करण्यात येणार आहे. तसेच, मोदी सरकारनं केलेल्या महत्त्वपूर्ण कामाचा, प्रकल्पांचा आढावा घेतला जाईल.
‘या’ शहरांमध्ये प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन मुंबईत, अनुराग ठाकूर अहमदाबादमध्ये, मीनाक्षी लेखी बेंगळुरूमध्ये, हरदीप पुरी लखनौमध्ये, अश्विनी वैष्णव गुवाहाटीमध्ये, भूपेंद्र यादव भोपाळमध्ये, अर्जुन राम मेघवाल हैदराबादमध्ये, जितेंद्र सिंह चेन्नईमध्ये, गजेंद्र सिंह पटना, मनसुख मांडविया कोलकात्यात स्मृती इराणी रोहतकमध्ये आणि पीयूष गोयल जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत.
इतर कार्यक्रमांचं आयोजन
मोदी सरकारचा 9 वर्षांचा प्रवास अविस्मरणीय करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं (BJP) एक मेगाप्लान केला आहे. यामध्ये केंद्र सरकारचं काम आणि 9 वर्षांतील कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे. याची सुरुवात 31 मे रोजी राजस्थानमधील अजमेर येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनं होणार आहे. यासोबतच ‘संपर्क से समर्थन’ कार्यक्रमही सुरू करण्यात येणार आहे.
31 मे ते 30 जून या कालावधीत चालणाऱ्या या विशेष मोहिमेत पक्षानं देशाच्या विविध भागांत सुमारे 51 मोठ्या जाहीर सभा घेण्याची योजना तयार केली आहे. ज्यामध्ये पीएम मोदी जवळपास 8 सभांना संबोधित करणार आहेत. त्यांच्याशिवाय अमित शहा, जेपी नड्डा, योगी आदित्यनाथ, स्मृती इराणी, हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह इतर नेतेही काही सभांना संबोधित करणार आहेत. भाजपच्या सोशल मीडिया टीमनं पक्षाच्या व्यापक प्रचाराची आखणी केली आहे.
मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण
नऊ वर्षापूर्वी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपचं सरकार सत्तेत आलं होतं. नऊ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारसमोर अनेक आव्हानं होती. पहिल्या पाच वर्षात त्यांनी या आव्हानांचा सामना करत लोकांना विकासाचं स्वप्न दाखवत अनेक योजना आणल्या अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. याच बळावर 2019 मध्ये ते दुसऱ्यांदा सत्तेत आले. आता मोदी सरकार सत्तेत येऊन नऊ वर्ष पूर्ण होत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta