नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत. मंगळवारी (३१ मे) कॅलिफोर्निया विश्वविद्यालयातील सिलिकॉन कॅम्पसमध्ये राहुल गांधींनी नागरिकांना संबोधित केलं. तेव्हा राहुल गांधींनी भाजपाबाबत मोठं विधान केलं आहे. “विरोधी पक्ष एकत्रित झाला, तर केंद्रातील भाजपा सरकारचा पराभव करणं शक्य आहे,” असं राहुल गांधींनी कर्नाटकचं उदाहरण देत सांगितलं आहे.
“मी भाजपाचा कमकुवतपणा स्पष्टपणे पाहू शकतो. विरोधकांनी युती केल्यास भाजपाचा पराभव होऊ शकतो. कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने भाजपावर मात करत पराभव केला, असा समज आहे. पण, कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने वेगळ्या दृष्टीकोणाचा वापर केला. ‘भारत जोडो यात्रे’च्या माध्यमातून आम्ही विजयाचा पाया रचला,” असं राहुल गांधींनी सांगितलं.
“कर्नाटक निवडणुकीत भाजपाने काँग्रेसपेक्षा १० पट अधिक पैसा खर्च केला,” असा आरोप करत राहुल गांधी म्हणाले, “विरोधकांच्या एकजुटीसाठी आम्ही काम करत आहोत. पण, भाजपाचा पराभव करण्यासाठी विरोधकांच्या एकजुटीपेक्षा पर्यायी दृष्टीकोणाची गरज आहे.”
“‘भारत जोडो यात्रा’ हा पर्यायी दृष्टीकोण बनण्यासाठी पहिला मार्ग होता. या माध्यमातून अनेक विरोधी पक्ष एकत्र आले. कोणताही विरोधी पक्ष ‘भारत जोडो यात्रे’च्या विचारांशी असहमत असेल असं वाटत नाही,” असेही राहुल गांधींनी सांगितलं.
“भाजपा लोकांना धमक्या देत, सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत आहे. आम्हाला लोकांना जोडण्यासाठी ज्या साधनांची गरज आहे, त्यावर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवकर संघाचं नियंत्रण आहे. त्यासाठी आम्ही ‘भारत जोडो जोडो’ यात्रा काढली होती,” असं राहुल गांधी म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta