पुणे : तब्बल ११ दिवस अंदमानमध्ये ठप्प झालेला मान्सून दोन दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात पोहचला होता. सध्या मान्सूनने बंगालचा संपूर्ण परिसर व्यापला असून, तो पुढे अरबी समुद्राच्या दिशेने आगेकूच करत आहे. पुढच्या १ ते दोन दिवसात मान्सून अरबी समुद्रात दाखल होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने आज (दि.०१ जून) दिलेल्या बुलेटीनमध्ये दिली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अंदमान निकोबार बेटांवर १९ जून पासून अडकलेल्या नैऋत्य मान्सूनने अखेर वेग धरला आहे. येत्या १ ते २ दिवसात मान्सून मालदिव बेटे, कौमारिन क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील काही भागांत तसेच अरबी समुद्राच्या काही भागात हजेरी लावणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
मान्सून ४ जून नंतर घेणार वेग
मान्सून अंदामानातून मालदिव बेटांपर्यंत आला आहे. तो दोन मार्गांनी भारतात येतो. पहिला मार्ग केरळ व दुसरा पश्चिम बंगाल, बिहारमार्गे उत्तर भारतात प्रवेश करतो. शास्त्रज्ञांच्या मते त्याची दुसरी शाखा सक्रिय होऊन तो ४ जूननंतर वेग घेऊ शकतो, असाही अंदाज आहे. मात्र त्याला अद्याप हवामान विभागाने दुजोरा दिलेला नाही.