चेरुकुपल्ली : आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यात एका शालेय विद्यार्थ्याची पेटवून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मृत विद्यार्थ्याच्या मित्राने इतर सहकाऱ्यांसोबत मिळून अंगावर पेट्रोल ओतून विद्यार्थ्याला जिंवत जाळल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु आहे.
चेरुकुपल्ली परिसरातील राजोलू गावाचा विद्यार्थी उप्पल अमरनाथ हा स्थानिक हायस्कूलमध्ये दहावीत शिकत होता. तो रोज सकाळी राजोलू येथे शिकवणीसाठी जात असे. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळीही तो शिकवणीसाठी घरून निघाला. वाटेत रेडलापलेम येथे त्याच्या एका साथीदाराने त्याच्यावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले.
स्थानिक लोकांनी त्या मुलाला आगीच्या आगीत तळमळताना पाहिले आहे. यावेळी एकच आराडा ओरड होत मोठ्या संख्येने लोक जमा झाले व विद्यार्थ्याला लागलेली आग शमवण्याचा प्रयत्न केला. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवल्यानंतर त्या विद्यार्थ्यास गुंटूरच्या जीजीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी अमरनाथने पोलिसांना सांगितले की, व्यंकटेश्वर रेड्डी आणि इतरांनी आपल्यावर पेट्रोल ओतून पेटवून दिले.