Thursday , September 19 2024
Breaking News

भाजपा मुस्लिमांना ‘मोदी मित्र’ प्रमाणपत्राने गौरविणार; ६५ लोकसभा मतदारसंघात ५० हजार मुस्लीम हितचिंतक तयार करणार

Spread the love

 

नवी दिल्ली : पुढील वर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून अल्पसंख्याक समाजात पक्षाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम, दृष्टी आणि पुढाकाराचे कौतुक करणाऱ्या लोकांना ‘मोदी मित्र’ असे प्रमाणपत्र देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
जानेवारी महिन्यात भाजपाने अल्पसंख्याक समाजापर्यंत पोहोचण्यासाठी हे नवे मिशन सुरू केले आहे. यामाध्यमातून पंतप्रधान मोदी यांचा संदेश आणि कल्याणकारी योजनांची माहिती देऊन अल्पसंख्याक समाजाचा पाठिंबा वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल.
भाजपाच्या अल्पसंख्याक विभागाने देशभरातील ६५ लोकसभा मतदारसंघाची यादी तयार केली आहे. हे मतदारसंघ १० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात आहेत. या मतदारसंघामध्ये अल्पसंख्याक समाजाची संख्या ३० टक्क्याहून अधिक आहे. या सर्व मतदारसंघात चार महिन्यांचा विस्तारीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
“भाजपाच्या केडरच्या व्यतिरिक्त असलेल्या अल्पसंख्याक समुदायापर्यंत पोहोचण्यासाठी पक्षाकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या कार्यक्रमातंर्गत समाजातील वकील, अकाऊंन्टन, माध्यमकर्मी, प्राध्यापक, डॉक्टर आणि इतर बुद्धिवंत जे आजवर भाजपाशी संबंधित नव्हते, अशा लोकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. यापैकी ज्या लोकांना मोदींची कार्यशैली आणि योजनांबद्दल आदर असेल अशा लोकांचे पक्षाकडून स्वागत करण्यात येईल”, अशी प्रतिक्रिया भाजपा अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.
या कार्यक्रमाची माहिती देत असताना ते पुढे म्हणाले, देशातील ६५ लोकसभा मतदारसंघातून प्रत्येकी एक समन्वयक नेमला जाणार आहे. तसेय या लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या विधानसभा क्षेत्रासाठीही एक-एक व्यक्ती समन्वयक म्हणून नेमला जाईल. या सर्व लोकांना, मोदींचे विचार मान्य असलेले किंवा मोदींच्या कामाची शैली आवडणारे ३० लोक हेरण्यास सांगितले जाईल. समन्वयकांनी हेरलेल्या ३० लोकांना त्यांच्या ओळखीतील २५ लोकांना या मिशनसोबत जोडून घेण्याचे आवाहन करण्यात येईल, जेणेकरून एका लोकसभा मतदारसंघात आमच्याकडे ७५० हितचिंतक असतील.
या मिशनच्या माध्यमातून आम्ही सर्व लोकसभा मतदारसंघातून मिळून ५० हजार मोदी मित्र गोळा करण्याचा प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. हे लोक पक्षाच्या केडरचा भाग नसतील. मात्र त्यांचा भाजपाला पाठिंबा असेल, असेही या सूत्राने सांगितले. तर सिद्दिकी म्हणाले की, या मिशनच्या अखेरीस सर्व हितचिंतकांना घेऊन एक मोठी जाहीर सभा दिल्लीत यावर्षी घेण्यात येणार आहे. या सभेला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करायला येणार आहेत.
सिद्दिकी यांनी पुढे सांगितले की, अल्पसंख्याक विभागाने सर्व मोदी मित्रांचे गट (ग्रुप) तयार केले असून पक्ष त्यांच्या संपर्कात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय आणि सरकार त्यांच्यासाठी करत असलेल्या कामांबाबतची माहिती सर्व गटांमध्ये पोहोचवली जाते. उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचण्याच्या आमच्या प्रयत्नांचे चांगले परिणाम दिसून आले. विशेषकरून पसमंदा मुस्लिमांनी चांगला पाठिंबा दिला. याचे पडसाद निवडणूक निकालात दिसून आले.
भाजपाने या निवडणुकीत मुस्लीम उमेदवारांना उमेदवारी दिली नाही, अशी टीका करण्यात आली होती. पण हे आरोप भाजपाने फेटाळून लावले. नगरपालिका, पंचायत समितीच्या अध्यक्षपदासाठी ३२ उमेदवार (१९९ पैकी) निवडणुकीत उभे करण्यात आले होते, ज्यापैकी पाच जणांचा विजय झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात अल्पसंख्याक समाजातून दिलेल्या उमेदवारांपैकी ९० टक्के उमेदवार हे पसमंदा मुस्लीम समुदायातील होते.
जानेवारी महिन्यात झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू समाजाच्या पलीकडे इतर समाजातही पक्षाला घेऊन जा, असे आवाहन केले होते. त्यानंतर अल्पसंख्याक समाजाकडून हे मिशन सुरू करण्यात आले. त्यानंतर देशभरातील एकूण लोकसभा मतदारसंघापैकी ३० टक्क्यांहून अधिक अल्पसंख्यकांची लोकसंख्या असलेले मतदारसंघ हेरण्यात आले. ६५ मतदारसंघापैकी उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी १३ मतदारसंघ आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये ५, बिहारमध्ये ४, केरळ आणि आसाममध्ये प्रत्येकी ६, मध्य प्रदेशमध्ये ३ आणि बाकीचे इतर ठिकाणी आहेत. या मतदारसंघामध्ये राहुल गांधी यांच्या केरळमधील वायनाड मतदारसंघाचाही समावेश आहे.
भाजपाने तयार केलेल्या मतदारसंघापैकी पश्चिम बंगालमधील बेहरामपूर (६४ टक्के मुस्लीम लोकसंख्या), जंगीपूर (६० टक्के), मुर्शीदाबाद (५९ टक्के) आणि जयानगर (३० टक्के. बिहारमधील किशनगंज (६७ टक्के), कटिहार (३८ टक्के), अरारिया (३२ टक्के) आणि पुर्नीया (३० टक्के) हे मतदारसंघ आहेत.
केरळमध्ये वायनाड (५७ टक्के), मलप्पुरम (६९ टक्के), पोन्ननी (६४ टक्के), कोझिकोड (३७ टक्के), वडकरा (३५ टक्के) आणि कासारगोड (३३ टक्के) एवढी अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये बिजनोर (३८.३३ टक्के) अमरोहा (३७.५ टक्के), कैराना (३८.५३ टक्के), नगीना (४२ टक्के), संभल (४६ टक्के), मुझफ्फरनगर (३७ टक्के) आणि रामपूर (४९.१४ टक्के) हे मुस्लीम बहुल मतदारसंघ आहेत.

About Belgaum Varta

Check Also

दोन लॉरी- बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू

Spread the love  चित्तूर : दोन लॉरींची आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *