Thursday , September 19 2024
Breaking News

“पाकव्याप्त काश्मीर परत मिळवायला भारताला फार कष्ट पडणार नाहीत”, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं विधान!

Spread the love

 

नवी दिल्ली : गेल्या काही दशकांपासून पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा पूर्ण काश्मीरप्रमाणेच चर्चेचा आणि वादाचा राहिला आहे. स्वातंत्र्यानंतर झालेल्या युद्धामध्ये पाकिस्ताननं काश्मीरचा हा भाग बळकावला. तेव्हापासून पाकव्याप्त काश्मीर हा दोन्ही देशांमध्ये वादाचा मुद्दा राहिला. भारतात आजपर्यंत सत्तेत आलेल्या सरकारांना पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतीय भूमीचा भाग करण्यात अपयश आलं असताना विरोधी पक्षांनी सातत्याने या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. यासंदर्भात आता केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मोठं विधान केलं आहे. पाकव्याप्त काश्मीर पुन्हा मिळवण्यासाठी भारताला फार कष्ट पडणार नाहीत, असं सूचक विधान राजनाथ सिंह यांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान भारत आणि अमेरिकेने काढलेल्या संयुक्त निवेदनात पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घातलं जात असल्याच्या मुद्द्यावर बोट ठेवण्यात आलं आहे. या निवेदनात दहशतवादाचा पूर्णपणे निषेध करण्यात आला असून आपला कोणताही भूभाग दहशतवाद्यांना कारवायांसाठी उपलब्ध होणार नाही याची काळजी घेण्याची तंबी पाकिस्तानला देण्यात आली आहे.

पाकिस्तानचं पित्त खवळलं!
दरम्यान, या निवेदनानंतर पाकिस्तानकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी लागलीच त्यावर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचा असा उल्लेख करणं अमान्य असल्याचं नमूद केलं. “भारत आणि अमेरिकेकडून काढण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात पाकिस्तानचा करण्यात आलेला उल्लेख अमान्य, एकांगी आणि गैरसमज पसरवणारा आहे. हा उल्लेख राजनैतिक शिष्टाचाराच्या विरुद्ध असून हेतुपुरस्सर करण्यात आला आहे. अमेरिकेबरोबर पाकिस्तान दहशतवादविरोधी मोहिमेत पूर्ण सहकार्य करत असताना हा उल्लेख निवेदनात समाविष्ट करण्यात आल्याचं आम्हाला आश्चर्य वाटतंय”, असं पाकिस्तानकडून नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, पाकिस्तानच्या या भूमिकेचा परराष्ट्रमंत्री राजनाथ सिंह यांनी समाचार घेतला आहे. “तुम्ही तुमचं घर सांभाळा. तिथे निर्माण झालेली परिस्थिती पाहाता काहीही घडलं तरी आश्चर्य वाटायला नको”, असं राजनाथ सिंह म्हणाल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. “पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी आम्हाला फार कष्ट करावे लागणार नाहीत. कारण भारतात पुन्हा सहभागी होण्याची मागणी तिथूनच केली जात आहे”, असंही राजनाथ सिंह यांनी नमूद केलं.

“पाकिस्तानला काहीही फायदा होणार नाही”
“पाकव्याप्त काश्मीर ताब्यात ठेवून पाकिस्तानला काहीही फायदा होणार नाही. भारताच्या संसदेनं पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग असल्याबाबत अनेक प्रस्ताव मंजूर केले आहेत. पाकिस्तानच्या भागातील काश्मीरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना हे दिसतंय की सीमेच्या या भागातील नागरिक सुखी-समाधानी आयुष्य जगत आहेत. त्यांच्यावर जेव्हा पाकिस्तान सरकारकडून अत्याचार केले जातात, तेव्हा आम्हाला वेदना होतात”, असंही राजनाथ सिंह म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

दोन लॉरी- बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू

Spread the love  चित्तूर : दोन लॉरींची आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *