नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकारने देशातील ५ कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. ऊसाचा रास्त व किफायतशीर दर वाढवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज (दि. २८ जून) घेतला. केंद्र सरकारने २०२३-२४ हंगामासाठी ऊसाच्या एफआरपीत प्रति क्विंटल १० रुपये वाढ करुन ३१५ रुपये प्रतिक्विंटल केली आहे, अशी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.
अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाने ऊस गाळप हंगाम २०२३-२४ साठी ऊस उत्पादक शेतकर्यांसाठी ३१५ रुपये प्रति क्विंटल या आतापर्यंतच्या सर्वोच्च एफआरपीला मान्यता दिली आहे. गेल्या हंगामात प्रतिक्विंटल एफआरपी ३०५ रूपये होती. या निर्णयामुळे पाच कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या ५ लाख लोकांना फायदा होणार आहे. यासोबतच साखर कारखानदार आणि संबंधित कामांमध्ये कार्यरत असलेल्या पाच लाख कामगारांनाही याचा लाभ मिळणार आहे.
ऊस उत्पादकांना हमीभाव मिळावा यासाठी ऊसाची एफआरपी निश्चित केली जाते. २०१४-१५ च्या हंगामात उसाची एफआरपी २१० रुपये प्रतिक्विंटल होती, ती आता २०२३-२४ हंगामासाठी ३१५ रुपये प्रतिक्विंटल करण्यात आली आहे.