नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (२१ जुलै) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या याचिकेवर नोटीस जारी करत याप्रकरणी ४ ऑगस्टला पुढील सुनावणी घेणार असल्याचं स्पष्ट केलं. राहुल गांधींनी गुजरात उच्च न्यायालयाने ‘मोदी चोर’ या वक्तव्याप्रकरणी दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत निकाल रद्द करण्याची मागणी केली आहे. याच निकालानंतर राहुल गांधींची लोकसभेतील खासदारकी रद्द झाली होती. आता या निकालामुळे लोकसभेच्या कामकाजात सहभागी होता येत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली आहे.
न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होत आहे. यावेळी राहुल गांधी यांच्यावतीने ऍड. अभिषेक मनु सिंघवी यांनी, तर तक्रारदारांच्यावतीने ऍड. महेश जेठमलानी यांनी बाजू मांडली. सिंघवी यांनी या निर्णयाने राहुल गांधींचे संसदेतील कामाचे अनेक दिवस वाया गेल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच आत्ता सुरू असलेल्या लोकसभा अधिवेशनातही राहुल गांधींना सहभागी होता येत नसल्याचं नमदू करत लवकरात लवकर पुढील सुनावणीची मागणी केली.
हे लोकसभा अधिवेशन ११ ऑगस्टला संपत आहे आणि लवकरच वायनाड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही घोषित होऊ शकते, असंही ऍड. सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर मांडलं. यानंतर ऍड. जेठमलानी यांनी याचिकेवर उत्तर देण्यासाठी १० दिवसांचा वेळ मागितला. यावर न्यायमूर्ती गवई यांनी उच्च न्यायालयाने शेकडो पानांचा निकाल दिलेला असताना नव्याने उत्तर देण्याची काय गरज आहे असा प्रश्न विचारला.
Belgaum Varta Belgaum Varta