नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठक पार पडली. 8 ऑगस्टपासून सुरू झालेल्या सहा सदस्यीय एमपीसीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली आहे. ते म्हणाले की, यावेळीही पॉलिसी रेट म्हणजेच, रेपो रेट कायम ठेवण्यात आला आहे. म्हणजेच, सध्या रेपो रेट 6.5 टक्केच असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची चिंता काहीशी दूर झाली आहे. गृहकर्ज किंवा वाहन कर्ज घेणाऱ्यांवर ईएमआयचा बोजा वाढणार नाही.
आरबीआयनं व्याजदरांबाबत यथास्थिती कायम ठेवली आहे. आरबीआयनं गेल्या वर्षी मे महिन्यात व्याजदर वाढवण्याची प्रक्रिया सुरू केली होती. फेब्रुवारीपासून रेपो दर 6.5 टक्क्यांवर स्थिर आहे. यानंतर, एप्रिल आणि जूनमध्ये झालेल्या दोन एमपीसीच्या बैठकीत बेंचमार्क दरांमध्ये कोणताही बदल झाला नाही, यावेळी देखील कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सलग तिसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेनं आपली भूमिका कायम ठेवली आहे.
रेपो दरात कोणताही बदल न करण्याची घोषणा करण्याबरोबरच, आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दावा केला की, भारत योग्य मार्गावर जात आहे आणि आगामी काळात ते जगातील विकासाचं इंजिन बनेल. ते म्हणाले की, आपण जगातील 5 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत. आपल्या अर्थव्यवस्थेत सतत वाढ होत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत होत असलेल्या बदलांचा फायदा घेण्यासाठी भारत सध्या सर्वोत्तम स्थितीत आहे.
फेब्रुवारीपासून रेपो दरात कोणताही बदल नाही
देशातील महागाईचा उच्चांक गाठल्यानंतर, रिझर्व्ह बँकेनं रेपो दर निर्धारित मर्यादेत परत आणण्यासाठी मे 2022 पासून सलग नऊ वेळा वाढ केली होती. या कालावधीत हा दर 250 बेसिस पॉईंट्सनी वाढवला होता. दरम्यान, महागाईवरील नियंत्रणासह, मध्यवर्ती बँकेनं त्याच्या वाढीला ब्रेक लावला आहे आणि फेब्रुवारी 2023 पासून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आरबीआय रेपो दर स्थिर ठेवणार असल्याची शक्यताही अनेक तज्ज्ञ व्यक्त करत होते. यापूर्वी एप्रिल आणि जूनमध्ये झालेल्या बैठकीत हा दर स्थिर ठेवण्यात आला होता.
Belgaum Varta Belgaum Varta