नवी दिल्ली : मणिपूरमध्ये जे काही चाललं आहे ते दुर्दैवी असून दोषींना कडक शिक्षा देण्यात येईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत सांगितलं. मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल, मणिपूरच्या मागे देश ठाम उभा आहे असंही ते म्हणाले. मणिपूरची आजची स्थिती ही काँग्रेसच्या काळात निर्माण झाल्याचा आरोपही मोदींनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मणिपूरवरील निवेदनाआधीच विरोधकांनी सभात्याग केला होता.
मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यावर बोलताना नरेंद्र मोदी यांनी मणिपूरची घटना दुर्दैवी असल्याचं सांगितलं. त्याचसोबत संसदेत भारतमातेबद्दल जे काही वक्तव्य करण्यात आलं तेही दुर्दैवी असल्याचं सांगत त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
मणिपूरमध्ये महिलांसोबत जे काही झालं ते चुकीचं झालं असून दोषींना कडक शिक्षा देणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. ते म्हणाले की, मणिपूरवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सविस्तर माहिती दिली, मणिपूरवर चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला. आता मी मणिपूरवासियांना सांगतोय की, देश तुमच्या मागे आहे. लवकरच त्या ठिकाणी शांतता नांदेल.
मणिपूर मुद्द्यावरून काँग्रेस आणि विरोधकांवर टीका करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, सत्तेत नसेल तर विरोधकांची काय अवस्था होते ते दिसतंय. काही जण भारतमातेच्या मृत्यूचं वक्तव्य करतात. हे ज्यांच्या मनात आहे तेच त्यांच्या कृतीत येत. हे तेच लोक आहे ज्यांनी भारताचे तुकडे केले. वंदे मातरम गीताचेही त्यांनी तुकडे केले. अकाल तख्तवर हल्ला करणारे आज आम्हाला प्रश्न विचारतात. विरोधकांना मणिपूरच्या मुद्द्यावरून राजकारण करायचं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ईशान्य भारतातील जनतेचा काँग्रेसने विश्वासघात केला. काँग्रेसने 1966 साली मिझोरमवर हल्ला केला होता. ईशान्य भारताचा नेहरू विकास करत नाहीत असा आरोप राममनोहर लोहिया यांनी केला.
मणिपूरच्या शाळांमध्ये एकेकाळी राष्ट्रविरोधी शिक्षण दिलं जायचं त्यावेळी त्याठिकाणी काँग्रेसचे सरकार असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ईशान्य भारतातील समस्यांची जननी काँग्रेस असल्याचा आरोपही त्यांनी केला. ईशान्य भारत हा आमच्या काळजाचा तुकडा असून त्याचा विकास हेच आमचं ध्येय असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta