नवी दिल्ली : केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये शनिवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनाचा मोठा अपघात झाला आहे. राजधानी लेहजवळील क्यारी गावातून जाणारं लष्कराचं एक वाहन दरीत कोसळलं आहे. या भीषण अपघातात भारतीय लष्कराच्या नऊ जवानांचा मृत्यू झाल्याचं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. नऊ जवान शहीद झाल्याची लष्कराने पुष्टी केली आहे, तर या अपघातात एक जवान जखमी झाला आहे. मृतांमध्ये आठ सैनिक आणि एक जेसीओ (ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर) यांचा समावेश आहे.
भारतीय लष्कराशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या या वाहनाबरोबर एक रुग्णवाहिका आणि एक यूएसव्ही गाडीदेखील जात होती. या सर्व वाहनांमध्ये लष्कराचे एकूण ३४ जवान प्रवास करत होते. शनिवारी संध्याकाळी ६.३० वाजता लष्कराच्या ट्रकचा अपघात झाला. लष्करी वाहनं क्यारी शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर असताना हा अपघात झाला. लष्कराचं वाहन खोल दरीत कोसळलं. हे जवान कारू गॅरीसनहून लेहजवळच्या क्यारी शहराच्या दिशेने जात होते.
Belgaum Varta Belgaum Varta