बंगळूर : २००१ च्या संसदेवरील दहशतवादी हल्ल्याच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी (१३ डिसेंबर) सुरक्षेचा मोठा भंग करताना, कामकाज सुरू असताना दोघाजणानी अभ्यागतांच्या गॅलरीतून लोकसभेच्या चेंबरमध्ये उडी मारली, घोषणाबाजी केली आणि पिवळ्या रंगाचा रासायनिक धूर सोडल्याने सभागृहात घबराट आणि गोंधळ उडाला. यापैकी दोघा आरोपींचे कर्नाटक कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्याच वेळी, इतर दोन आरोपी – अमोल शिंदे आणि नीलम देवी यांनी संसदेच्या आवाराबाहेर ‘ तानाशाही नही चलेगी (हुकूमशाही चालणार नाही)’ असे ओरडत डब्यातून रंगीत गॅस फवारला.
दिल्ली पोलिसांनी कठोर बेकायदेशीर कामकाज (प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि हे चौघेजण या घटनेची योजना आखणाऱ्या सहा जणांच्या गटाचा भाग असल्याचे सांगितले. सध्या पाच आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.
दोघांचे कर्नाटक कनेक्शन
आरोपींपैकी एक डी. मनोरंजन हा म्हैसूरमधील विजयनगरचा आहे, तर दुसरा सागर शर्मा हा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे, परंतु तो बंगळुरमध्ये राहत होता आणि यापूर्वी तो म्हैसूरलाही गेला होता.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा हा लखनौमधील आलमबाग परिसरातील रामनगरचा रहिवासी होता आणि तो ई-रिक्षा चालवत होता. त्याचे वडील सुतार काम करतात, असे पोलिसांनी सांगितले.
भाड्याच्या घरात राहणाऱ्या शर्माच्या कुटुंबीयांनी सांगितले की, चार दिवसांपूर्वीच ते दिल्लीला जाण्यासाठी घरातून निघाले होते आणि अधिक तपशील न सांगता काही निषेधात भाग घेण्यासाठी तिथे गेले.
त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, शर्मा पूर्वी बंगळुरमध्ये काम करत होते. सागर त्याच्या आई-वडील आणि बहिणीसोबत शहरात राहत होता, असेही पोलिसांनी सांगितले.
त्यांना म्हैसूरचे खासदार प्रताप सिम्हा यांनी संसदेत प्रवेश करण्यासाठी पास दिला होता. दुसरीकडे, मनोरंजन हा मूळचा म्हैसूरचा रहिवासी आहे; तो २०२२ मध्ये म्हैसूरमध्ये सागर शर्माला, ललित झा या आणखी एका आरोपीसह भेटला होता, जिथे त्यांनी देशाचे लक्ष वेधण्यासाठी संसदेत घुसण्याची योजना आखली होती. नंतर नीलम (वय ३७) आणि अमोल (वय २५) या योजनेत सामील झाले.
एका पोलीस अधिकाऱ्याने म्हैसूर येथील मनोरंजनच्या घरी जाऊन त्याचे वडील देवराजेगौडा यांची भेट घेतली. त्याची गुन्हेगारीची कोणतीच पार्श्वभुमी नसल्याचे आढळून आले आहे.
दोषी सिध्द झाल्यास फाशी द्या
माझा मुलगा मनोरंजन दोषी सिद्ध झाल्यास फाशी द्या, असे त्याचे वडील म्हणाले. ते पुढे म्हणाले, “माझ्या मुलाचे चारित्र्य सोन्यासारखे आहे. त्याला नेहमीच लोकांचे भले करायचे होते. त्याने असे कृत्य केले हे ऐकून मला धक्का बसला. पण महान व्यक्तीने बांधलेले मंदिर असलेल्या संसदेवर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. ज्याने हे केले आहे, ते चुकीचे आहे. जर तो दोषी असल्याचे सिद्ध झाले तर तो आता माझा मुलगा नाही,” ते म्हणाले.