नवी दिल्ली : 1993 मधील मुंबई सिरिअल ब्लास्टचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम याला पाकिस्तानच्या कराचीतील एका खासगी रूग्णालयात भरती केल्याची माहिती समोर येत आहे. एका अज्ञात व्यक्तीनं विषप्रयोग केल्यानंतर कुख्यात डॉन दाऊदची तब्येत बिघडली आणि त्यानंतर प्रकृती चिंताजनक झाल्यानं त्याला रूग्णालयात भरती करण्यात आल्याचं वृत्त सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाकिस्तानी मिडियाद्वारे याबाबतची माहिती समोर आली आहे. मात्र यासंदर्भात भारत किंवा पाकिस्तान सरकारकडून कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अशातच पाकिस्तामधील कराची, इस्लामाबाद आणि रावळपिंडी या तीन महत्वाच्या शहरांमध्ये इंटरनेटसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारं दाऊदबाबतचं वृत्त खरं असल्याचंही बोललं जात आहे.
दाऊदची प्रकृती चिंताजनक
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दाऊद इब्राहिमला कराचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावर अनेक यूजर्सकडून केला जात आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं विषप्रयोग केल्याचा दावा केला जात आहे. यामुळे दाऊदला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दाऊदच्या टोळीतील एका माजी सदस्यानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून दाऊद गंभीर आजारामुळे कराचीतील रुग्णालयात दाखल आहे, त्याला दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याला कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आलं आहे. दाऊदला रुग्णालयातील ज्या मजल्यावर दाखल करण्यात आलं आहे, तिथे कोणालाही जाण्याची परवानगी नाही. केवळ उच्चपदस्थ अधिकारी आणि कुटुंबातील जवळचे लोकच तिथे जाऊ शकतात.
महत्त्वाची बाब म्हणजे, दाऊदवर खरंच विषप्रयोग झालाय का? याबाबत अद्याप कोणतंही अधिकृत वृत्त हाती आलेलं नाही. मात्र, मुंबई पोलीस अधिकारी दाऊदच्या जवळच्या नातेवाईकांकडून (पुतण्या अलिशा पारकर आणि साजिद वागळे) याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगण्यात येत आहे.