Monday , December 8 2025
Breaking News

ऐतिहासिक कामगिरी; पाच महिन्यानंतर ‘आदित्य एल १’ पोहोचले निश्चित स्थळी

Spread the love

 

नवी दिल्ली : देशाच्या पहिल्या सौर मोहिमेतील ‘आदित्य एल १’ उपग्रहाने सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील गुरुत्वाकर्षण समतोल बिंदूंपैकी एक बिंदू- ‘लँगरेंज पॉइंट १’ (एल-१) वर यशस्वीरित्या पोहोचण्याचा विक्रम केला आहे. पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर सूर्याच्या दिशेने हे यान ११० दिवसांनी पोहोचले आहे. ‘आदित्य-एल १’ ही अवकाशीय सौर वेधशाळा असून, ती सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करणार आहे. हा यशस्वी टप्पा पार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इस्रोचे अभिनंदन व्यक्त केले आहे.

भारताने आणखी एक टप्पा पूर्ण केला आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला. “भारताने आणखी एक टप्पा पूर्ण केला आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला. भारताची पहिली सौर वेधशाळा आदित्य एल१ हे उपग्रह निश्चितस्थळी पोहोचले आहे. आमच्या शास्त्रज्ञांनी अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या अंतराळ मोहिमा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम केले. त्याचेच हे यश आहे. संपूर्ण देश या कामगिरीसाठी शास्त्रज्ञांचे अभिनंदन व्यक्त करत असताना मीदेखील त्यात सामील होत आहे. मानवतेच्या विकासासाठी विज्ञानाचे नवे नवे क्षितीज गाठण्याचा प्रयत्न आम्ही करत राहू”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने आदित्य एल-१ हे अवकाशयान २ सप्टेंबर रोजी प्रक्षेपित केले. सूर्याच्या सर्वात वरील आवरणाचा, म्हणजेच सूर्य प्रभामंडळाचा (करोना) अभ्यास करण्यासाठी हे यान पाठवले आहे. यासाठी आदित्य एल-१ मध्ये वेगवेगळी उपकरणे (पेलोड) बसवण्यात आली आहेत. सौरवादळांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम, सूर्याचं तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर आणि अंतराळातील हवामान या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने ही सौरमोहीम हाती घेतली आहे.

‘एल-१’ म्हणजे काय?
अंतराळातील मोठे वस्तुमान असलेल्या दोन वस्तूंमध्ये (तारे, ग्रह, उपग्रह इत्यादी) गुरुत्वाकर्षण असते. या दोन वस्तूंमधील काही बिंदू असे असतात की तेथे दोन्हींचे गुरुत्वाकर्षण समतोल (बॅलन्स) असते. अशा बिंदूंना ‘लँगरेंज पॉइंट’ म्हटले जाते. इटालियन संशोधक जोसेफ लुई लँगरेंज यांच्या स्मरणार्थ हे नाव देण्यात आले आहे. सूर्य आणि पृथ्वीदरम्यान आतापर्यंत असे पाच बिंदूू खगोल अभ्यासकांना सापडले असून त्यांना एल-१, एल-२, एल-३, एल-४ आणि एल-५ अशी नावे देण्यात आली आहेत. ‘आदित्य’ हे अंतराळयान एल-१ या बिंदूवरून सूर्याचा अभ्यास करणार असल्याने मोहिमेचे नाव ‘आदित्य एल-१’ असे ठेवण्यात आले आहे. अलीकडेच ‘नासा’ आणि ‘युरोपियन स्पेस एजन्सी’ने (ईएसए) संयुक्तपणे काढलेल्या ‘सोलर ऑर्बिटर’ मोहिमेतून तुलनेने लहान सौरवाऱ्यांचा शोध लागला होता. आदित्यच्या निरीक्षणांमधून यावर अधिक प्रकाश पडेल, अशी संशोधकांना अपेक्षा आहे.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *