
पणजी : बंगळुरूतील एका स्टार्ट अप कंपनीची सीईओ असलेल्या महिलेने गोव्यात आपल्याच चार वर्षांचा मुलाचा जीव घेतला आणि त्याचा मृतदेह बॅगमध्ये भरला. ही महिला आपल्या चार वर्षांच्या मुलासह गोव्याला गेली होती. तिथे जाऊन तिने मुलाची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह बॅगमध्ये भरुन कर्नाटकात परतली. महिलेने रुममधून चेकआऊट केल्यानंतर साफसफाईसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना रक्ताचे डाग दिसले, त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला. सूचना सेठ असं तिचं नाव आहे.
गोवा पोलिसांनी याबाबत कर्नाटक पोलिसांना कल्पना दिली. त्यानंतर पोलिसांनी सूचना सेठला अटक केली. दरम्यान मुलगा आणि त्याच्या वडिलांची भेट होऊ नये, यासाठी महिलेने त्याची हत्या केल्याचं समोर आलं.
का केली हत्या?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेत असलेली आरोपी महिला सूचना सेठ हिचं 2010 मध्ये लग्न झालं होतं. 2019 मध्ये आरोपी मगिलेनं एका मुलाला जन्म दिला होता आणि 2020 मध्ये तिचा पतीसोबत वाद सुरू झाला. हे प्रकरण न्यायालयात गेलं, त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. मुलाच्या वडिलांना रविवारी मुलाला भेटता येईल, असे आदेश न्यायालयानं दिले होते.
न्यायालयाच्या निर्देशांनंतर आरोपी महिला दबावाखाली आली. आपल्या मुलानं पतीला भेटू नये, अशी महिलेची इच्छा होती. त्यामुळे तिनं आपल्या मुलालाच संपवण्याचा निर्णय घेतला. महिलेनं कट रचला, शनिवारी मुलासह गोवा गाठलं आणि तिथे जाऊन आपल्या 4 वर्षांच्या मुलाची हत्या केली. आपल्या मुलालाच संपवलं चर पती आपल्या मुलाला भेटूच शकणार नाही, असं त्या महिलेला वाटत होतं. त्यामुळेच महिलेनं मुलाची हत्या केली.
Belgaum Varta Belgaum Varta