पटना : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार ‘एनडीए’च्या वाटेवर आहेत. ते बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन नवे मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या तयारीत आहे. नितीश कुमार २८ जानेवारी रोजी जेडीयू आणि भाजप सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे, असे वृत्त ‘इंडिया टुडे‘ने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. तर भाजप नेते सुशील मोदी हे नवे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.
बिहारमधील राजकीय घडामोडीवर भाष्य करताना सुशील मोदी म्हणाले की, “बंद झालेले दरवाजे पुन्हा उघडू शकतात”. त्यांनी राजकारणाला “शक्यतांचा खेळ” असे म्हटले आहे. पण, त्यांनी या विषयावर अधिक बोलण्यास नकार दिला.
नितीशकुमार यांचा जेडीयू आणि लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) यांच्या सध्याच्या युतीमध्ये बेबनाव निर्माण झाला असून बिहारमध्ये जेडीयू- भाजप एकत्र येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
नितीशकुमार यांच्या सूत्रांनी सांगितले की, ते सध्या युतीतील मित्रपक्ष लालू यादव यांचा आरजेडी आणि इंडिया आघाडीतील काँग्रेस या दोघांवरही नाराज आहेत. रोहिणी आचार्य यांच्या ट्विटमुळेही त्यांनी नाराजीचा सूर व्यक्त केला आहे.
गेल्या आठवड्यापासूनच नितीश कुमार यांनी त्यांची भूमिका बदलली आहे. त्यांनी घराणेशाहीबाबत जाहीर विधान करून लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य केले. बुधवारी त्यांनी काँग्रेसने दिलेले भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण पूर्वनियोजित कार्यक्रमांचे कारण सांगून नाकारले होते.
पुन्हा ‘यू टर्न’
७२ वर्षीय नितीशकुमार हे बिहारच्या राजकारणातील ताकदवान नेते आहेत व त्यांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षाही लपून राहिलेली नाही. २०१३ पासून त्यांचे ‘एनडीए’ ते ‘यूपीए’ ते महागठबंधन असे चारवेळा ‘यू टर्न’ झाले आहेत. आधी ते ‘यूपीए’मध्ये होते. त्यानंतर त्यांनी ‘एनडीए’ची कास धरली. त्यानंतर तेथून बाहेर पडत महागठबंधनमध्ये प्रवेश केला. आतासुद्धा इंडिया आघाडीच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला; पण आता तेच पुन्हा ‘एनडीए’च्या तंबूत जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.