पटना : बिहारमध्ये कालपासून राजकीय उलथापालथ सुरू आहे. आज या राजकीय घडामोडींना पूर्णविराम लागला आहे. नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. नितीश कुमार यांनी भारत माता की जय आणि जय श्री रामच्या घोषणा देत शपथ घेतली. तेव्हा जीतन राम मांझी, चिराग पासवान, सम्राट चौधरी, जेपी नड्डा उपस्थित होते.
नितीश यांच्यासह जनता दल (युनायटेड) नेते विजय कुमार चौधरी आणि बिजेंद्र प्रसाद यादव आणि भाजप नेते सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे बिहारचे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जातेय. बिहारमधील बदललेल्या राजकीय समीकरणात नितीशकुमार यांना आता नवे मंत्रिमंडळ मिळणार असल्याने रातोरात आरजेडीचे मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर पडले आहेत.
नितीश कुमार यांनी राजदशी असलेली आपली युती तोडली असून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. गेल्या दोन वर्षांपासून महाआघाडीच्या रुपात संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस आणि डावे सत्तेत होते. मात्र, नितीश कुमार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे बिहारमधील सरकार आपोआपच बरखास्त झाले. तद्नंतर भाजपाने नितीश कुमार यांना पाठिंबा दिला. हा पाठिंबा मिळताच नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला.
१० वर्षांत पाच वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ
नितीश कुमारांनी आज (२८ जानेवारी) नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. गेल्या १० वर्षांत त्यांनी पाच वेळा वेगवेगळ्या आघाडी आणि युतीसह सत्ता स्थापन केली होती. तर, २०२२ मध्ये त्यांनी एनडीएची साथ सोडून राजद-काँग्रेसच्या महागंठबंधन सरकारमध्येही ते मुख्यमंत्री बनले होते. तर, आता दोनच वर्षांत त्यांनी महागठबंधनची साथ सोडून पुन्हा एनडीएला जवळ केले आहे. म्हणजे दोन वर्षांत त्यांनी दोनदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.