जामताडा : झारखंडच्या जामताडा जिल्ह्यात रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात आतापर्यंत 12 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेक जण गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. अपघातग्रस्त झालेले सर्व प्रवासी अंग एक्सप्रेसने प्रवास करत होते. या दरम्यान कुणीतरी रेल्वे गाडीत आग लागल्याची अफवा पसरवली. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी चालू रेल्वे गाड्यांमधून रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या. पण याचवेळी समोरुन झाझा-आसनसोल ट्रेन आली. ही गाडीसुद्धा वेगात होती. त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर उडी मारलेले प्रवासी या गाडीच्या खाली चिरडले गेले. प्रवाशांनी यावेळी प्रचंड आक्रोश केला. पण त्यांनी स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रचंड प्रयत्नही केला. पण 12 जणांचा यात मृत्यू झाला.
जामताडा-करमाटांडच्या दरम्यान कलझारियाजवळ जवळपास ट्रेनखाली चिरडल्याने 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर घटनास्थळी रेल्वे पोलीस, स्थानिक प्रशासन, अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात नेलं जात आहे. स्थानिक नागरीक देखील बचाव कार्यात पोलिसांना मदत करत आहेत.
जामाताडाचे आमदार इरफान अंसारी यांनी सांगितलं की, त्यांना रेल्वे अपघाताची माहिती मिळाली आहे. ही हृदयद्रावक घटना आहे. त्यांनी जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासनासोबत बातचित करुन तातडीने मदत पोहोचवण्यास सांगितलं आहे. ते देखील घटनास्थळाच्या दिशेला रवाना झाले आहेत. ही घटना कुणाच्या निष्काळजीपणामुळे घडली, कुणामुळे घडली, याची चौकशी व्हायला हवी. दरम्यान, रेल्वे ट्रॅकवर सध्या अंधार असल्यामुळे बचाव कार्यात अडथळा येत असल्याची देखील माहिती मिळत आहे.