नवी दिल्ली : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. तसेच विशेष न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर आता पंजाबमधील आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनाही अटक केली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कारण पंजाबमधील मद्य धोरणाप्रकरणीसुद्धा ईडीकडून चौकशी सुरू आहे.
केजरीवालांच्या अटकेनंतर शुक्रवारी पंजाब भाजपाचे प्रमुख सुनील जाखड यांनीही पंजाबमधील मद्य धोरणाप्रकरणी सखोल ईडी चौकशीची मागणी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी या प्रकरणी, तीन अधिकाऱ्यांची चौकशीही करण्यात आली आहे.
यामध्ये वित्त आयुक्त (अबकारी) के.ए.पी. सिन्हा आणि वरुण रूजम आणि नरेश दुबे यांचा समावेश आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांनी मिळून २०२२ मध्ये पंबाजमधील मद्यधोरण तयार केले होते.
आणखी एक योगायोग म्हणजे, या धोरणांतर्गत पंजाबमध्ये मद्य विक्रीसाठी घाऊक परवाने (L1) मिळालेल्या दोन कंपन्यांचे प्रवर्तक दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळ्यात आरोपी आहेत. तसेच पंजाबमधील धोरण ठरवताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी रुजम आणि दुबे हे दोन्ही अधिकारी उपस्थित असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. तर दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळेही विविध चर्चांना उधाण आले आहे.
यासंदर्भात बोलताना पंजाबमधील एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले, की “आमचे धोरण यशस्वी ठरले होते. त्याद्वारे आम्ही करोडो रुपये कमावले आहेत. पण केंद्र सरकार या सगळ्याला कशा पद्धतीने घेते, हे येणारा काळ ठरवेल. याप्रकरणी आधीच पंजाबमधील आपच्या आमदारांवर ईडीने छापे टाकले आहेत, पुढे काय होईल, हे कोणालाही माहिती नाही.”
दरम्यान यासंदर्भात बोलताना, भाजपाचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड म्हणाले, “केजरीवाल यांना अटक झाली, त्याप्रमाणेच पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनाही अटक होऊ शकते. पंजाबमधील आम आदमी पक्षाने उत्पादन शुल्क धोरण नावाने राज्यातील जनतेचे हजारो कोटी रुपये लुटले आहेत.”