नवी दिल्ली : एक दु:खद बातमी समोर आली आहे. रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे शनिवारी निधन झालं. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. प्रकृती खालावल्यानंतर शुक्रवारी त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिकच खालावली. शनिवारी पहाटे ३.४५ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रामोजी राव यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९३६ रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पेड्डापरुपुडी येथे झाला होता. त्यांनी १९९ मध्ये रामोजी फिल्म सिटीची स्थापना केली होती. येथे दरवर्षी सुमारे २०० चित्रपटांचे चित्रीकरण होते. आत्तापर्यंत येथे जवळपास २००० चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.
यात हिंदी, भोजपुरी, तेलुगु, तमिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली, ओरिया आणि इतर भाषांमधील चित्रपटांचा समावेश आहे. क्रिश-३, जय हो, रोबोट, किस्मत कनेक्शन, सरकार राज, गोलमाल, हिम्मतवाला, चेन्नई एक्सप्रेस आणि दिलवाले इत्यादी हिंदी चित्रपटांचा समावेश आहे.
याशिवाय प्रभासच्या बाहुबली चित्रपटाच्या दोन्ही भागांचे शूटिंग येथे पूर्ण झाले आहे. देशातील व्यवसाय, प्रसारमाध्यमे आणि चित्रपट निर्मिती या क्षेत्रात रामोजी राव यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ज्यामध्ये फिल्म स्टुडिओ रामोजी फिल्म सिटी व्यतिरिक्त, ईटीव्ही नेटवर्क, डॉल्फिन हॉटेल्स, मार्गदर्शी चिटफंड आणि ईनाडू तेलुगू वृत्तपत्र यांचा समावेश आहे.
२०१६ साली रामोजी राव यांना शिक्षण, पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. रामोजी राव यांनी अचानक जगाचा निरोप घेतल्याने सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे.