राजू पोवार : मानकापूर जळीत ऊस क्षेत्राला भेट
निपाणी (वार्ता) : माणकापूर येथील मळी भागातील सुमारे २५ एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला. हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळेच ही घटना घडली. आतापर्यंत निपाणी भागातील अनेक गावात शॉर्ट सर्किटने शेकडो एकरातील उसाचे नुकसान झाले आहे. पण आज पर्यंत हेस्कॉमतर्फे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. मानकापूर येथे घडलेल्या आगी संदर्भात पंचनामे झाले असून तात्काळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन एक हजार रुपये भरपाई मिळावी, अन्यथा रयत संघटनेतर्फे आंदोलन केले जाईल, असा इशारा रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी दिला.
मानकापूर येथे शॉर्टसर्किटने झालेल्या ऊसाच्या नुकसानीची पाहणी करून राजू पोवार बोलत होते.
मानकापूर येथील लागलेल्या ऊसाला आगीमुळे सुमारे ९० लाखांचे नुकसान झाले आहे. माणकापूर येथील शेतीसाठी सकाळी १० ते २ अशी लाईट होती. सकाळी १० वाजता लाईट आल्यानंतर शॉर्टसर्किट झाल्याने उसाच्या फडाला आग लागली. बघता बघता काही मिनिटांमध्येच आग सर्वत्र पसरली. शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा अतोनात प्रयत्न केला. पण सर्वांचा नाईलाज झाला. त्यानंतर अग्निशामक दलाला दूरध्वनी वरून या घटनेची माहिती देण्यात आली.
घटनास्थळी सदलगा येथील अग्निशमन दल दाखल झाल्यानंतर काही आग नियंत्रणात आली. या आगीत आगीत संजय माळी यांचा २ एकर, विजय माळी ७ एकर, जयपाल चौगुले ३ एकर, दादासो निनुरे २० गुंठे, रामा कोळी व बंधू १ एकर, आण्णासो चौगुले व बंधू २ एकर, जयपाल वलशेट्टी १ एकर २० गुंठे, लोहार, लोंढे, कासार, कोळी आदी शेतकऱ्यांचा ऊस जळाला आहे. त्यासोबत कुपनलिका, चेंबर, ठिबकच्या पाईप, पेटी असे इतर साहित्यदेखील जळाले. या सर्व घटनेचा तलाठी व हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे. त्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी. अन्यथा रयत संघटनेतर्फे विधानसभेसमोर आंदोलन केले जाणार आहे. सध्या ऊस उत्पादकासाठी लागणारा खर्च वाढला आहे. त्यामुळे कारखानदारांनी याची दक्षता घेतली पाहिजे. त्यानुसार यंदाच्या हंगामातील ऊसाला साखर कारखान्यांनी साडेतीन हजार रुपये तर सरकारने दोन हजार रुपये दिलेच पाहिजे. यंदाच्या हंगामात साखर कारखान्यांची एकजूट असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सुद्धा संघटित राहून लढा दिल्यास चांगला दर मिळू शकतो. यापूर्वी काळात शेतकऱ्यांनी संघटित राहून लढा देणे आवश्यक असल्याचे राजू पोवार यांनी सांगितले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते धनंजय माळी उर्फ नाना, जय माळी, महाराष्ट्राचे माजी कृषी अधिकारी जयपाल चौगुले बोरगाव येथील हेस्कॉमचे अधिकारी एस. ओ. गंगाधर, मानकापूर तलाठी, सनदी, रयत संघटनेचे मानकापूर शाखाध्यक्ष पवनकुमार माने, संतोष जिरगे, निपाणी तालुका रयत संघटना अध्यक्ष रमेश पाटील, रमेश मोरे, संजय माळी,, रामा कोळी, श्रीपती निंनगुरे, वैभव कुंभार, बबन जामदार यांच्यासह शेतकरी हजर होते.
Belgaum Varta Belgaum Varta