
अधिकाऱ्यांनी दाखवली माणुसकी : अर्भक बेळगाव बिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल
निपाणी (वार्ता) : शहराच्या पश्चिमेला असलेल्या बदलमुख रस्त्याच्या कडेला गुरुवारी (ता.२४) सकाळी नवजात अर्भक आढळून आले. पुरुष जातीचे अर्भक एका पिशवीत सोडले होते. साक्षीदाराने अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानुसार महिला व बालविकास अधिकारी, डी. बी. सुमित्रा, डॉ. जी. बी. मोरबाळे यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे अर्भकाचे प्राण वाचवण्यात यश आले. अर्भकाला तात्काळ येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केल्याने अर्भकाचा जीव वाचला आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या बुदलमुख गावच्या शेजारील रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, डॉ. जी. बी. मोरबाळे हे गुरुवारी (ता.२४) सकाळी सीबीएससी शाळेजवळील हुडको कॉलनीतील घरामधून सकाळी फिरण्यासाठी अर्जुनी -बुदलमुख रस्त्यावर गेले होते. साडेसातच्या सुमारास फिरून परत येत असताना त्यांना बुदलमुख रस्त्यावरील डाव्या बाजूस असलेल्या महादेव मंदिराच्या परिसरातून एका लहान बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. रडण्याच्या दिशेने डॉ. मोरबाळे यांनी धाव घेतली असता त्यांना त्या रस्त्याच्याकडेला जुन्या पद्धतीच्या वायरीच्या बास्केटमध्ये एक गोंडस अर्भक दिसले. ते थंडीने कुडकुडत होते. त्याला देखील असह्य झाले होते. व तोंडावर कापड असल्यामुळे ते गुदमरून देखील जात होते. पण डॉ. मोरबाळे यांनी प्रसंगावधान दाखवून त्याच्या तोंडावरील कापड बाजुला करून त्याला श्वास घेण्यास वाट मोकळी करून त्यानंतर तात्काळ आपल्या घरी येऊन आपले वाहन घेऊन जाऊन सदरची घटना पोलीस ठाण्याला कळवून ते अर्भक त्यांच्या ताब्यात दिले. डॉ. मोरबाळे यांच्या प्रसंगावधानामुळे अर्भकाचे जीव वाचवण्यात मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या या कार्याबद्दल निपाणी परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. घटनेची गांभीर्य ओळखून घटनास्थळी निपाणी शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी के. बी. दड्डी व सहकाऱ्यांनी धाव घेऊन अर्भक आपल्या ताब्यात घेऊन गांधी हॉस्पिटलमध्ये डॉ. संतोष घाणिगेर, व इतर कर्मचाऱ्यांनीतातडीने अर्भकाला उबदार कपड्यांमध्ये गुंडाळून शेकोटी देऊन त्याला गरम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अर्भक वाचण्यात देखील हातभार लागला.
—————————————————————
माता शिशु संगोपन केंद्र असूनही अडचण
महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये माता शिशु संगोपनाची मोठी इमारत बांधण्यात आली आहे. पण तेथे बालरोग तज्ञ नसल्यामुळ अधिक उपचारासाठी अर्भकाला बेळगाव येथील बीम्स रुग्णालयामध्ये हलवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
————————————————————–
अधिकाऱ्यांनी जपली माणुसकी
डॉ. मोरबाळे यांच्यासह साखरवाडी येथील रुपेश कुंभार, निपाणीच्या महिला व बालकल्याण अधिकारी डी.बी. सुमित्रा, उपनिरीक्षिक कृष्णवेणी गुर्लहोसुर यांनी देखील सामाजिक बांधिलकी जपत योग्य ती मदत केली. अर्भकाच्या पालकांचा पोलिसाकडून शोध सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta