पुनर्रचना, आरक्षण रद्द : नव्या आरक्षणाची प्रतीक्षा
निपाणी : येत्या दोन महिन्यात जिल्हा पंचायत, तालुका पंचायत निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मतदारसंघ पुनर्रचना होऊन आरक्षणही जाहीर झाले होते. जाहीर आरक्षणाप्रमाणे निपाणी मतदारसंघात इच्छुकांनी निवडणुकीची तयारीदेखील सुरू केली होती. मात्र उच्च न्यायालयाने मतदारसंघ पुनर्रचना व आरक्षणाची अधिसूचनाच रद्द केल्याने निवडणूक लढविण्याच्या प्रयत्नांवर पाणी फिरले आहे. आता पुन्हा एकदा नव्याने मतदारसंघ पुनर्रचना व आरक्षण जाहीर होणार असल्याने मनाप्रमाणे आरक्षण यावे, याकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत. आरक्षण रद्द झाले असले तरी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून नेतेमंडळींनी निपाणी मतदारसंघात विधानसभेची रंगीत तालीम चालविल्याचे चित्र दिसत आहे. एप्रिल महिन्यात जिल्हा पंचायत व तालुका पंचायतींची पंचवार्षिक मुदत संपली. या पार्श्वभूमीवर निवडणुकीची तयारी म्हणून फेब्रुवारीत मतदारसंघ पुनर्रचना करण्यात आली. निपाणी जिल्हा पंचायतीचे मतदारसंघ ४ वरून ६ करण्यात आले. तर तालुका पंचायतीचे मतदारसंघ २० वरून १६ करण्यात आले. मात्र या पुनर्रचनेसंदर्भात अनेक तक्रारी दाखल झाल्या. यासंदर्भात पूर्ण निर्णय होईपर्यंतच जुलै महिन्यात निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी निपाणी मतदारसंघात किमान ५० टक्के जागांवर सामान्य आरक्षण येणे अपेक्षित असताना तसे झाले नाही. असे असतानाही सदर आरक्षण अंतिम असल्याचे भासवण्यात आले. यातून आरक्षणानुसार त्या त्या भागातील इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली. काहींना नेतेमंडळींनी ग्रीन सिग्नल दिल्यामुळे विकासकामांच्या उद्घाटनासह विविध कार्यक्रम करण्यावर जोर दिला. अशातच प्रभाग पुनर्रचना व आरक्षणासंदर्भात न्यायालयात दाखल झालेल्या दाव्यांची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने मतदारसंघ पुनर्रचना व आरक्षणाची अधिसूचनाच रद्द करण्याचा आदेश दिला. यामुळे इच्छुकांना झटका बसला. निवडणुका कधी होतील? याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. तरीदेखील जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्यापूर्वी जिल्हा व तालुका पंचायत निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे येत्या दोन महिन्यात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. मतदारसंघ पुनर्रचनेचे अधिकार गठीत करून यासाठी स्वतंत्र आयोग नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. निपाणी मतदारसंघातील सध्याचे चित्र पाहता भाजप आघाडीवरच आहे. गेल्या महिन्याभरात शहर व ग्रामीण भागात गरिबांना अन्नधान्य किट वितरण व विकासकामांचा धडाका मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी लावला आहे. त्या तुलनेत काँग्रेस गोटात मात्र फारशी हालचाल दिसून येत नाही. वस्तुस्थिती पाहता काँग्रेसमध्ये अजूनही अंतर्गत धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे. सध्या भाजपसाठी निपाणी विधानसभा मतदारसंघात ‘अच्छे दिन’ असले तरी आगामी निवडणूक या पक्षालाही सोपी नाही. गत जिल्हा पंचायत निवडणुकीत निपाणी मतदारसंघात ४ पैकी ३ जिल्हा पंचायत सदस्य हे भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते. मात्र या तीन पैकी सिद्धू नराटे हे एकटेच भाजपमध्ये सक्रिय आहेत. जयवंत कांबळे यांनी तीन वर्षांपूर्वीच भाजपशी फारकत घेतली. तर कारदगा जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे यादेखील गेल्या काही दिवसात भाजपच्या व्यासपीठावर फारशा दिसत नाहीत. त्यामुळे भाजपमध्येही सर्व आलबेल आहे, असे म्हणता येणार नाही. परिणामी मतदार संघातील बहुतांशी सत्ताकेंद्रांवर एकहाती सत्ता असतानाही तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला कंबर कसावी लागणार आहे.
उत्तम पाटलांची घोडदौड
बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील यांच्याकडे मतदारसंघातील ग्रामपंचायतीची सत्ता वगळता कोणतेही राजकीय मोठे पद नसताना कोरोना आणि महापूर काळापासून मतदारसंघात सततचे दौरे करून जनसंपर्क वाढविला आहे. याशिवाय मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची नुकतीच भेट घेतली. ही भेट वस्त्रोद्योगासंदर्भात असली तरी त्याची वेगळ्या प्रकारे चर्चा सुरू आहे. याशिवाय बेळगाव जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रभाकर कोरे, मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव यांना आपल्या टेक्स्टाईल पार्कमध्ये भेटी घेतल्या आहेत. शिवाय महाराष्ट्राचे नेते मंडळींशी संपर्क वाढविला आहे. उत्तम पाटील हे रमेश जारकीहोळी यांनाच आपले नेते मानतात. त्यामुळे त्यांनी दोन्हीकडे आपली चाल ठेवली आहे. यातून काँग्रेस-भाजपचे नेते व कार्यकर्तेही संभ्रमात सापडले असल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणूक लढवायचीच या निर्धाराने ते सक्रिय झाले आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीनंतरच त्यांची वाटचाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.