बुधवारी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त : सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाई
निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न बुधवारी (ता.३०) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता.२९) सकाळी येथील शासकीय विश्रामधामात आंतरराज्य पोलिसांची बैठक झाली. त्यामध्ये होणाऱ्या सुनावणीनंतर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी या बैठकीत आंतरराज्य पोलिसांची चर्चा झाली. शिवाय बुधवारी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. तरीही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महानिरीक्षक आलोककुमार यांनी स्पष्ट केले.
सकाळी नऊ वाजता या आंतरराज बैठकीला सुरुवात झाली. त्यामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र, सावंतवाडी आणि इतर विभागातील पोलीस अधिकारी, विविध जिल्ह्याचे पोलीस प्रमुखांनी सहभाग घेतला होता. सीमाप्रश्नाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार दिवसांपूर्वी कर्नाटक- महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या वक्तव्यावरून दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. यामध्ये बस सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. त्याची चौकशी सुरू असून दोषीवर कारवाई होणार आहे.
बुधवारी सीमा प्रश्नावर सुनावणी होणार असल्याने कोणता निकाल येईल, याची माहिती कोणालाच नाही. तरीही निकालानंतर कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांच्या सीमेवर चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. विशेषता कोगनोळी, कागवाड, निपाणी, संकेश्वर या भागातील चेक पोस्टवर विशेष नजर राहणार आहे.
कर्नाटकात २९ डिसेंबरपासून विधानसभेचे अधिवेशन होणार आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणूनच ही बैठक घेतली आहे. महाराष्ट्रातील काही नेते मंडळी जळगाव आत येणार असल्याचे ट्विटर व वरून सांगितले आहे. ते वैयक्तिक अथवा नातेसंबंधातील कार्यक्रमासाठी येत असतील तर आमचा विरोध नसून सार्वजनिक कार्यक्रम अथवा कायदा सुव्यवस्था बिघडेल असे वक्तव्य करण्यासाठी येत असतील तर त्यांना वेळीच रोखले जाईल. सध्या तरी कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागात १४४ कलम लागू करण्याची आवश्यकता नाही. बुधवारच्या परिस्थितीनंतर शाळा, महाविद्यालय, बस सुविधा व इतर व्यवस्थेबाबत विचार करून निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे निर्णय काहीही झाला तरी नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. मंगळवारपासूनच सीमा भागात पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू राहणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
——————————————————-
कोल्हापूर पोलीस ऑनलाईनवर
आंतरराज्य बैठकीसाठी बेळगाव कोल्हापूर शहर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना निमंत्रण दिले होते. पण कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी निपाणीला बैठकीस येण्यास टाळले. अखेर त्यांनी ऑनलाईन वरूनच पोलीस बैठकीमध्ये सहभाग घेतला.
आंतरराज्य बैठकीस आयजीपी सतीशकुमार, महालिंग नंदगळी, जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख रवींद्र गडादी, सावंतवाडी विभागाच्या पोलीस प्रमुख डॉ. रोहिणी साळुंखे, चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक बसवराज एलिगार, पाण्याचे मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, आथणी येथील मंडळ पोलीस निरीक्षक एस. बी. गिरीश, बी. एस. तलवार, उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसुर यांच्यासह कर्नाटक महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी उपस्थित होते.
————————————————
शांततेने आंदोलन करणाऱ्यांनाच परवानगी
सीमा प्रश्नाबाबत कोणताही निर्णय झाला तरी विविध संघटना व नागरिकांनी संयम बाळगावा. याचिकेवरील सुनावणीनंतर शांततेने आंदोलन करणाऱ्यांनाच परवानगी दिली जाईल. अन्यथा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व समाजातील शांतता बिघडवणाऱ्यावर कायदेशीर कारवाई होणार असल्याचेही आलोककुमार यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta