दोन कॉन्स्टेबलचा समावेश : 40 हजाराची लाच स्वीकारताना सापडले रंगेहात
निपाणी : पान मसाला कारखानदारांकडून 40 हजाराची लाच स्वीकारताना सदलगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कुमार हित्तलमनी यांच्यासह दोन पोलीस कॉन्स्टेबल वर एसीबीने कारवाई केली. गुरुवारी (ता.8) रात्री उशीरा ही घटना घडली आहे. बऱ्याच वर्षानंतर एसीबीने ही कारवाई केल्याने निपाणी आणि सदलगा भागात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिकृत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, रायबाग येथे कार्यरत असलेले उपनिरीक्षक कुमार हित्तलमनी यांनी केवळ दहा दिवसापूर्वी सदलगा पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला होता. या काळात बोरगाव येथील राजू पाच्छापुरे यांच्या पान मसाला कारखान्याची पाहणी करून हा व्यवसाय बंद करा अन्यथा आपल्याला 40 हजार रुपये देण्याची मागणी केली होती. त्यामुळे पाच्छापूरे यांनी याबाबतची माहिती एसीबी कार्यालयाला कळविली होती. त्यानुसार बेळगाव एसीबी प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त करूनाकर शेट्टी आणि सहकाऱ्यांनी सापळा रचून उपनिरीक्षक हित्तलमनी, पोलीस कॉन्स्टेबल मायाप्पा गड्डे, श्रीशैल मंगी यांना 40 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. रात्री उशीरापर्यंत त्यांच्यावरील ही कारवाई सुरूच होती. हित्तलमनी यांनी यापूर्वी संकेश्वर पोलिस ठाण्यांमध्ये उपनिरीक्षक म्हणून काम केले होते. रायबाग येथून आठवड्यापूर्वी येऊन पानमसाला कारखानदारांकडून रकमेची मागणी केल्याने ते लोकायुक्त जाळ्यात सापडले आहेत. या घटनेमुळे सदलगा, चिक्कोडी आणि निपाणी परिसरात रात्री उशिरापर्यंत विविध प्रकारच्या चर्चेला ऊत आला होता.