
दोन्ही राज्याकडून बंदोबस्त कडक : वाहनधारकांना त्रास
कोगनोळी : बेळगाव येथे सोमवार तारीख १९ रोजी होणाऱ्या महा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून कर्नाटकात नेते मंडळी व कार्यकर्ते जाणार या पार्श्वभूमीवर कर्नाटक महाराष्ट्र पोलीसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.
कर्नाटक पोलिसांच्या वतीने सकाळी सात वाजता येथील दूधगंगा नदीवर बॅरिगेट लावून वाहनांची तपासणी सुरू केली. महामेळाव्यासाठी जाणाऱ्या लोकांना त्यांनी सीमेवरूनच परत महाराष्ट्रात पाठवून दिले. सीमा नाक्यावर मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आल्याने व वाहने तपासून सोडत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या ट्रक चालक व इतर वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
सकाळी दहा वाजता महाविकास आघाडीचा मोर्चा येणार असल्याची बातमी समजतात कर्नाटक पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली. यावेळी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेकडो पोलीस सीमारेषेवर तैनात करण्यात आले. यामुळे कागल येथील आरटीओ तपासणी नाका ते कोगनोळी टोल नाका परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. मोर्चा येणाऱ्या पार्श्वभूमीवर कागलहून निपाणी कडे जाणारा मार्ग अन्य वाहनाना बंद करण्यात आला. सुमारे तीन तासाहून अधिक एकेरी वाहतूक सुरू केली होती.
येथील दूधगंगा नदीवर महाराष्ट्र कर्नाटक पोलिसांच्या वाहनामुळे काही काळ वाहनांची गर्दी झाली होती.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांनी कर्नाटकात येणारा मुख्य रस्ता बॅरिकेट लावून बंद केला. यावेळी या मोर्चेधारकांना अडवण्यासाठी सुमारे 300 हून अधिक पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले होते.
जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर संजीव पाटील, डी वाय एस पी मनोज कुमार नाईक, डीवायएसपी बसवराज यल्लीगार, निपाणी मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, उपनिरीक्षक अनिल कुंभार यांच्यासह अन्य 300 पोलीस तैनात करण्यात आले होते.
महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने डीवायएसपी, तीन पोलीस निरीक्षक, चार सहाय्यक पोलीस निरीक्षक, दहा उपनिरीक्षक, 200 पोलीस कर्मचारी तैनात होते.
Belgaum Varta Belgaum Varta