निपाणी रोटरी क्लबचे आवाहन : रक्ताचा तुटवडा
निपाणी (वार्ता) : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून रक्तदात्यांची संख्या घटली आहे. पण अपघात, शस्त्रक्रिया व इतर उपचारासाठी रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे शहर व परिसरातील रोटरी क्लबला रक्तदान करून सहकार्य करावे असे आवाहन येथील रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
गेल्या २८ वर्षापासून येथील रोटरी क्लब निपाणीसह परिसरात प्रामाणिकपणे समाजसेवेचे काम करत आहे. क्लबच्या माध्यमातून अनेक रुग्णांना माफक दरात रक्तपुरवठा करून जीवदान देण्याचे काम केले आहे. ही सेवा यापुढेही अविरतपणे सुरू राहावी व रुग्णांना अल्पदरात सेवा मिळावी, यासाठी रक्तदात्यांनी रोटरी ब्लड बँकेला रक्तदान करून सर्वसामान्य रुग्णांना जीवदान द्यावे.
कोरोनानंतर रक्तदानाच्या बाबतीत व्यापारीकरणच सुरू झाले आहे. शहरासह गावात काहीकडून समाजसेवी संस्था व युवक मंडळांना हाताशी धरून रक्तदान शिबिर राबवत आहेत. पण ते रक्त दुसरीकडे पुरवठा केले जात असून ते चढ्या दरानेही विकल्याचेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे रूग्णांना त्याचा अर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे सध्या येथील रोटरी ब्लड बँकेमध्ये रक्ताचा तुकडा जाणून लागला आहे. त्यामुळे अनेक रुग्ण परत जात आहेत.
या रक्तपेढीतून रूग्णांना दिले जाणारे रक्त तज्ञांमार्फत तपासणी केल्यानंतरच संबंधित रुग्णाला दिले जाते. त्यामुळे यापुढे निपाणी परिसरातील अनेक समाजसेवी संस्था, युवक मंडळांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे आयोजित करून रोटरी क्लबला सहकार्य करावे, असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीप पठाडे, सचिव आशिष कुरबेट्टी यांनी केले आहे.