
उत्तम पाटील युवाशक्तीतर्फे तात्पुरती डागडुजी
निपाणी (वार्ता) : बोरगाव ते इचलकरंजी, कुरुंदवाड, बेडकिहाळ, हुपरी तथा अन्य मार्गे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालवणे अडचणीचे ठरले आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा उपोषण करण्याचा इशारा नगरसेकांसह नागरिकांनी दिला आहे.
बोरगाव येथे उत्तम पाटील युवाशक्ती मार्फत स्वखर्चाने परिसरातील मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात मुरूम टाकून रस्त्यांची डागडुजी करण्यात आली. त्यावेळी नागरिकांनी हा इशारा दिला.
निपाणी तालुक्यात लोकसंख्येच्या तुलनेत दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून बोरगाव शहराकडे पाहिली जाते. शिवाय सीमाभागातील मोठे आणि महाराष्ट्रालगत असणाऱ्या मोठ्या शहरांना जोडणारा हा आंतरराज्य मार्ग आहे. परिसरातील रस्ते या शहरांमधूनच गेल्याने वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे आणि वाहनांची असलेली नित्याची रहदारी यामुळे दिवसेंदिवस या मार्गावर अनेक अपघात घडत आहेत. अनेकजण खड्डे चुकविण्याच्या नादात वाहनांचा अपघात होऊन मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे सदर मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे असतानाही लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आपण युद्ध पातळीवर हे खड्डे बुजवून तात्पुरता रस्ता रहदारीस उपयुक्त करत आहोत. येत्या पंधरा दिवसात रस्त्याची डागडुजी संबधित विभागाने न केल्यास आपण तीव्र आंदोलन करणार असल्याचे नगरसेवक माणिक कुंभार, अभय मगदूम, शोभा हवले अभियंते राजेंद्र पाटील सांगितले.
दरम्यान उत्तम पाटील युवा शक्तीच्या पुढाकाराने भागातील प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजवून प्रवाशांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी नगरसेवक रोहित माने, प्रदीप माळी, तुळशीदास वसवाडे, जावेद मकानदार, पिंटू कांबळे, अमर शिंगे, अभय करोले, बी. टी. वठारे ,अनिल गुरव, बाळासाहेब सातपुते, आण्णासाहेब ढोंगे, इंद्रजीत पवार, अशोक नेजे, फारुक मुजावर, संगापा ऐदमाळे, पोपट नांगरे-पाटील, देवगोंडा पाटील, राजेंद्र पाटीलसह उत्तम पाटील युवाशक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta