निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरात अजूनही 24 तास पाणी योजना पूर्ण क्षमतेने सुरू नाही. याशिवाय अनेक प्रभागात चार ते सहा दिवसातून एकदा पाणी येत आहे. याशिवाय पाणी येण्यापूर्वी काही वेळ हवा येत असल्याने मीटर फिरून त्याचे बीलही नागरिकांना दिले जात आहे. त्यासंदर्भात नगरपालिकेवर मोर्चा काढून बऱ्याचदा निवेदन दिले होते. पण कोणतीच कारवाई न झाल्याने सोमवारी आम आदमी पक्षाच्या येथील पदाधिकाऱ्यांनी डॉ. राजेश बनवन्ना यांच्या नेतृत्वाखाली थेट घंटी वाजवत नगरपालिका प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. शिवाय योजना पूर्णपणे कार्यान्वित होईपर्यंत जुन्याच पद्धतीने बीले देण्याची मागणी केली.
नळाला पाणी येण्यापूर्वी बराच काळ त्यामधून हवा बाहेर येत असल्याने मीटर फिरून बिल वाढत आहे. यासंदर्भात नगरपालिका प्रशासन व अधिकाऱ्यांना प्रात्यक्षिक करून याबाबतची माहिती दिली होती. नंतर १७ जानेवारी रोजी नगरपालिकेवर मोर्चाही काढला होता. त्यानंतर ४ फेब्रुवारी, ९ फेबुवारीला स्मरण-पत्र देण्यात देऊन सुद्धा नगर पालीकेने कोणतेही उत्तर दिले नाही.
याबाबत नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये नागरिकांनीही सहभाग नोंदवला होता.
यावेळी भाटले यांनी, ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईपर्यंत अधिक पाणी बील भरण्याची जबरदस्ती करण्यात येणार नाही. यापुढील काळात पूर्वीप्रमाणे बिल भरून घेतले जाईल असे सांगितले.
डॉ. बनवन्ना यांनी,पाणीपुरवठा संदर्भात नागरिकांच्या तक्रारी असल्यास आम आदमी पक्षाकडे तक्रारी केल्यास त्याची दखल घेऊन निवारण करण्यात येईल, असे सांगितले.
सभापती राजू गुंदेशा यांनी पाणी प्रश्नासंदर्भात नागरीकांच्या सोबत असून सर्वांना पाणी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी वाशिम पठाण, आदर्श गिजवणेकर, कांचन बिरनाळे-पाटील महेश कंगळे, हसन मुल्ला, लतीफा पठाण, दिपक कांबळे, पृथ्वीराज कांबळे, सदाशिव पोवार, सिद्धार्थ कांबळे, शंकर चौगुले, अक्षय कार्वेकर, नंदकिशोर कंगळे, छाया लोहार लक्ष्मी हजारे यांच्यासह संभाजी नगर, आंदोलन नगर, साखरवाडी, जत्राट वेस, कामगार चौक, भाट गली आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta