
पाणी बिलावर विरोधीगट, नागरिक आक्रमक : पालिका प्रशासन धारेवर
निपाणी (वार्ता) : २४ तास पाणी योजनेचे अपूर्ण काम, अनियमित पाणीपुरवठा, वाढीव पाणी बिल यासह विविध मागण्यांसाठी शहर व उपनगरातील नागरिकांनी विरोधी गटनेते विलास गाडीवड्डर यांच्या नेतृत्वाखाली विरोधी नगरसेवकांनी गुरुवारी (ता.१६) नगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढला.
येथील बेळगाव नाक्यावरील बॅरिस्टर नाथ पै यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला प्रारंभ झाला.
जुना पीबी रोडवरून नगरपालिकेवर मोर्चा काढला. नगरपालिकेच्या दारात विरोधी नगरसेवक, नागरिकांनी नगरपालिका प्रशासन आणि सत्ताधार्यांविरोधात घोषणाबाजी केली. नगराध्यक्ष जयवंत भाटले आणि आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांच्यासह सत्ताधारी गटाचे नगरसेवक नगरपालिका कार्यालयाबाहेर आले.
विरोधी गटनेते विलास गाडीवड्डर म्हणाले, गेल्या अडीच वर्षात सत्ताधाऱ्यांनी पाणीयोजनेच्या दुरुस्तीसाठी म्हणून ५ कोटी ११ लाख रुपये खर्च केले आहेत. पाणी योजनेची सर्व यंत्रणा नवीन असताना दुरुस्तीसाठी एवढे पैसे खर्च का केले? जैन इरिगेशननेही पाण्यात मोठा भ्रष्टाचार केला आहे. पाण्याचे योग्य नियोजन करण्यात नगरपालिकेला अपयश आले आहे’. २४ तास पाणी योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होपर्यंत जुन्याप्रमाणेच महिना १२० रुपये अशी पाणीपट्टी भरण्याचा आदेश नगरपालिकेने द्यावा, पाणीप्रश्नी त्वरित सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली.
नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार म्हणाले, सत्ताधाऱ्यांना विकासकामे राबवताना अपयश आले आहे’. २४ तास नको, निदान दररोज दोन तास तरी पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली. नगरसेविका अनिता पठाडे यांनी आपल्या प्रभागात अडीच वर्षे पाणीपुरवठा सुरळीत नाही. तसेच गेल्या दहा वर्षात रस्ते, वीज, पाणी यातील एकही मूलभूत सुविधा झाली नसल्याचा आरोप केला.
नगरसेवक शौकत मनेर, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, दिलीप पठाडे यांच्यासह नागरिकांनीही मनोगत व्यक्त केले.
सुरळीत पाणीपुरवठा आणि वाढीव पाणीपट्टी संदर्भात विलास गाडीवड्डर यांच्या हस्ते आयुक्त जगदीश हुलगेज्जी व नगराध्यक्ष जयवंत भाटले यांना निवेदन देण्यात आले.
नगराध्यक्ष जयवंत भाटले म्हणाले, पाणीपुरवठ्यासंदर्भात ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. वाढीव बिलाची समस्या जिल्हाधिकाऱ्याना कळवली आहे. गळत्या रोखल्या जात असून २१ प्रभागांमध्ये २४तास पाणीपुरवठा सुरू होता. मात्र तलावाची आणि नदीची घटती पाणीपातळी लक्षात घेऊन मे महिन्यापर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी शहरात सध्या सगळीकडे दोन दिवसाआड पाणीपुरवठा करणार आहे. त्याचे नियोजन झाल्यास पुढील काळात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करू तसेच पाणीप्रश्नासंदर्भात २१ मार्चला सर्वपक्षीय बैठक नगरपालिकेत बोलवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
यावेळी नगरसेवक डॉ. जसराज गीरे, दत्तात्रय नाईक, सुनीता गाडीवड्डर, जीवन घस्ते, मंगल घोरपडे, किरण नागेश, पंकज गाडीवड्डर, प्रकाश तारळे, बाजीराव घाटगे, सचिन पोवार, डॉ. अजित चव्हाण, असलम मिरशिकारी, बाबासाहेब ढेकळे, अजित पोवार, महेश खराडे, अजित नाईक, नियर खानापुरे यांच्यासह नागरिक, महिला उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta