सावली गायब : प्रवाशांना उन्हाचा सामना
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 चे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे या ठिकाणी असणाऱ्या दोन्ही बाजूच्या वृक्षांची तोड करण्यात आली आहे. महामार्गाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या वृक्षांची तोडणी झाल्याने महामार्ग उजाड दिसू लागला आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने महामार्गावरून जाताना दुपारच्या सत्रात अनेक ठिकाणी वाहनधारक आपली वाहने महामार्गाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या वृक्षांच्या सावलीत लावून विश्रांती घेत होते. पण या वृक्षांची तोड झाली असल्याने महामार्गावरून जात असताना थांबण्यासाठी सावलीच शिल्लक उरली नाही. यामुळे महामार्गाच्या वाहन थांबा येथे वाहनधारक उन्हातच आपली गाडी उभा करून विश्रांती घेत असल्याचे दिसू लागले आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार चे रस्ता रुंदीकरणाचे काम जलद गतीने सुरू असून काम एक दोन वर्षात पूर्ण होणार आहे. पण हे काम करण्यासाठी तोडण्यात आलेले वृक्ष पुन्हा लावून ते मोठी होण्यासाठी विलंब लागणार आहे. यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना सावलीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सरपणासाठी महिलांची गडबड
राष्ट्रीय महामार्गावरील वृक्ष संबंधित ठेकेदाराकडून मशीनद्वारे तोडण्याचे काम सुरू असताना आसपास असणाऱ्या खेड्यातील महिलांची सरपण गोळा करण्यासाठी गडबड उडाल्याचे दिसून आले. महामार्ग कर्मचाऱ्याकडून वृक्षाचा मुख्य भाग घेऊन जात होते. उर्वरित भाग तेथेच सोडून गेल्याने तो नेण्यासाठी गर्दी झाली होती.
Belgaum Varta Belgaum Varta