Monday , December 8 2025
Breaking News

निपाणी मतदारसंघात ईर्षेने मतदान!

Spread the love

 

गावागावात चुरस :टक्केवारी वाढीसाठी सर्वांचेच प्रयत्न

निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यापासून निपाणी मतदार संघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमुळे ग्रामीण भागात बुधवारी (ता. १०) मतदानादिवशी सकाळी ७ वाजल्यापासूनच कडक ऊन असतानाही सर्वच मतदान केंद्रावर चुरशीने मतदान होत होते. काही ठिकाणी दिवसभर ऊन सावलीचा खेळ राहण्यासह काही ठिकाणी ढगाळ वातावरण झाले होते. शिवाय मतदार समूहाने जात असल्याने सायंकाळी ५ वाजेपर्यंत निपाणी मतदारसंघात ६८ टक्क्याहून अधिक मतदान झाले. डोंगर पट्टासह काही ठिकाणी किरकोळ वादावादीचे प्रसंग वगळता मतदान शांततेत झाले.
बुधवारी (ता. १०) विवाहासह वास्तूशांतीचे मुहूर्त असल्याने अनेक मतदार सकाळच्या टप्प्यातच मतदान आटोपून कार्यक्रमस्थळी जातानाचे दृश्य गावागावात दिसत होते. ग्रामीण भागात मतदान केंद्राच्या १०० मीटर आवाराबाहेर विविध पक्षाचे काऊंटर उभारले होते. शिवाय कार्यकर्त्याकडून मतदानासाठी मतदान चिठ्ठी यांचे वाटप केले जात होते.
अपंग, वृद्ध मतदारांचे घरोघरी मतदान करून घेण्याची व्यवस्था असतानाही अनेक अपंग वृद्धांनी थेट मतदान केंद्रावर येऊन मतदान केले. मतदान केंद्राबाहेर गटागटाने पक्षांना मिळणाऱ्या टक्केवारीबद्दल चर्चा सुरु होती. गावागावात सोशल मिडियावर निवडणुकीतील मतदानाबाबतचे संदेश दिवसभर फिरत असल्याने कार्यकर्ते मोबाईलवरच नजर ठेवून होते. काही संदेश अफवा पसरणारे असल्याने त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन उमेदवारांनी केले. काही गावात मतदार याद्यांमध्ये व प्रभागांमध्ये घोळ झाल्याने मतदारांना बराच वेळ मतदानासाठी तिष्ठत थांबावे लागले. अखेर कर्मचारी व अधिकाऱ्यांनी संबंधित मतदारांना मतदान कागदपत्रांची पूर्तता करून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दिले. वृद्ध, अपंग मतदारांना ने -आन करण्यासाठी सर्वच उमेदवारांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वापर केला. वेळेत मतदान होण्यासाठी एक एक मतासाठी उमेदवार व कार्यकर्ते झटतांना दिसत होते.


गावागावात उमेदवार नेते मंडळींची भेट
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार आणि नेते मंडळींनी वर्चस्वासाठी जोरदार प्रचार यंत्रणा राबविली होती. बुधवारी मतदान असल्याने प्रत्येक गावात जाऊन सर्वच पक्षाच्या नेतेमंडळींनी मतदान केंद्र परिसराची माहिती जाणून घेतली.
——————————————————–
उन्हामुळे सकाळच्या सत्रात मतदानासाठी गर्दी
सकाळच्या टप्प्यात ऊन कमी असल्याने निपाणी शहर व ग्रामीण भागातील अनेक मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून आली.
निपाणी विधानसभा मतदारसंघात सखी मतदान केंद्रावर सकाळच्या टप्प्यात महिलांची बऱ्याच ठिकाणी गर्दी दिसून आली.निवडणूक आयोगाने महिला, दिव्यांग व तरुणांसाठी विशेष मतदान केंद्रांची सोय केली होती.
—————————————————————

दिव्यांग, वृद्धांसाठी वाहने
दिव्यांग आणि वृद्ध मतदारांना ने आण करण्यासाठी उमेदवारांनी वाहनांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया जलद गतीने पार पडत होती. सकाळच्या टप्प्यात अपवाद वगळता सर्वच मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन सुरळीतपणे सुरू होते.
————————————————————-
शहरात दुपारनंतर गर्दी
ग्रामीण भागातील नागरिक सकाळच्या टप्प्यात मतदान करून शेतीकामाकडे जाताना दिसत आहेत. मतदारसंघातील शहरी भागात सकाळच्या टप्प्यात मतदान केंद्रे रिकामी दिसत होतु. अशा ठिकाणी दुपार ३ नंतर गर्दी जाणवत होती.
————————————————————-
नावे गहाळ
शहर आणि ग्रामीण भागातील अनेक प्रकार केंद्रावर काही नागरिकांची नावे मतदार यादीतून गायब झाली आहेत. त्यामुळे अनेक कार्यकर्ते शोधूनही नावे न सापडल्याने मतदान न करता अनेकांना परतावे लागत आहे. याउलट मृत झालेल्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली होती.
———————————————————–
गळतग्यात अर्धा तास मशीन बंद
निपाणी मतदारसंघातील गळतगा येथील प्रभाग सात मधील मतदान केंद्रावर दुपारी १२.३० वाजता ईव्हीएम मशीन बंद पडले. त्यामुळे नागरिकांना मतदानासाठी ताटकळत थांबावे लागले. अखेर नवीन मशीन जोडल्यानंतर अर्धा तासाने मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू झाली.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव पट्टणपंचायतीच्या निधीतून आयको परिसरात पाणी योजनेचे उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव उपनगर असलेल्या आयको येथील मल्लिकार्जुन नगरमधील नागरिकांना अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *