राजू पोवार : विरोधकांनी केला अपप्रचार
निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदार संघातील शेंडूर ते मानकापूर पर्यंत दौरा केला. यावेळी मतदारांना धर्मनिरपेक्ष जनता दलाची ध्येय धोरणे पटवून दिली. पण विरोधकांनी अपप्रचार केल्याने मतदार संघात पक्षाला अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले. तरीही मतदारसंघातील विकास कामासकामे आणि शेतकऱ्यावरील अन्याय दूर करण्यासाठी आपण रयत संघटनेच्या माध्यमातून निरंतरपणे कार्यरत राहणार असल्याची माहिती धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवार आणि चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी दिली. मंगळवारी (ता.१६) आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
राजू पोवार म्हणाले, या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा लढा झाला. त्यामध्ये धनशक्तीचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याने लोकशाहीचा गळा घोटला गेला. गेल्या तीन चार वर्षापासून रयत संघटनेच्या माध्यमातून अतिवृष्टी, महापूर, आणि लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यावर झालेल्या अन्याय बाबत स्थानिक अधिकाऱ्यापासून मुख्यमंत्र्यापर्यंत आवाज उठवला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. शेतकऱ्यांना संघटित करून त्यांच्यामध्ये जनजागृती घडवून आणली आहे. वेळप्रसंगी मोर्चे आंदोलन करून कारागृहाची हवा सुद्धा खाल्ली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या जोरावरच आपण ही निवडणूक लढवली. मात्र काही मतदारांनी आमिषाला बळी पडल्याने आपणाला पराजय स्वीकारावा लागला आहे. या पराभवाला खचून न जाता यापुढील काळात संघटनेच्या जोरावर बळीराजासाठी लढत राहणार आहे. याशिवाय कार्यकर्त्यांची फळी मजबूत करून पक्षाला बळकट करण्याचे काम करणार आहे. चांगल्या कामांना पक्षाचा पाठिंबा राहणार असून भ्रष्टाचार होत असल्यास पक्ष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नसल्याचे पोवार यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta