
पर्यावरण अधिकारी रमेश; निपाणीत प्रबोधनपर नाटिका
निपाणी (वार्ता) : गेल्या दशकापासून सर्वत्र प्लास्टिकचा वापर वाढला आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका पोहोचत आहे. त्यामुळे सरकारने सिंगल युज प्लास्टिक वर पूर्णपणे बंदी घातली आहे. तरीही अनेक जण प्लास्टिक कॅरीबॅगसह इतर प्लास्टिकच्या वस्तू वापरून त्या फेकून देत आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात पाण्याचे प्रदूषण होत असून गटारीही तुंबत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणाचा समतोल टिकून ठेवण्याचे आवाहन चिकोडी येथील पर्यावरण अधिकारी रमेश यांनी केले. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि निपाणी नगरपालिकेतर्फे आयोजित प्लास्टिक बाबत प्रबोधनपर येथील बस स्थानकात आयोजित नाटिके प्रसंगी ते बोलत होते.
रमेश म्हणाले, दिवसेंदिवस प्लास्टिक कचऱ्याची समस्या वाढत चालली आहे. त्याचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होत आहे. नागरिकांनी त्याचा वापर करून घरातील साठलेला कचरा घंटागाडीला देऊन सहकार्य करावे. अनेक कुटुंबे घरातील कचरा गटारीमध्ये फेकून देत असल्याने गटारी तुंबून रोगांना सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे आवाहन केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रबोधन पर नाटिकेचे उद्घाटन झाले. यावेळी धुळगणवाडी येथील भरत कलाचंद्रतर्फे नाटिकेच्या माध्यमातून कचऱ्याबाबत प्रबोधन करण्यात आले. यावेळी गाण्यांच्या माध्यमातून स्वच्छतेची माहिती देण्यात आली. निपाणी नगरपालिकेचे पर्यावरण अभियंते स्वानंद तोडकर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी पर्यावरण विभागाचे एइओ जगन्नाथ, निपाणी आगार प्रमुख संगाप्पा, धनाजी कांबळे, बाळू खोत यांच्यासह नगरपालिकेतील आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta