
दहावी परीक्षेत मिळवले ९७ टक्के गुण; वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छा
निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात आपली मुले शैक्षणिक क्षेत्रात अहवाल मानांकन मिळवावेत या उद्देशाने अनेक पालक विविध प्रकारच्या शिकवण्यावर अभ्यासावर भर देतात. पण अशा प्रकारची घरची कोणतीही पार्श्वभूमी नसताना शेंडूर येथील दयानंद सावंत या निपाणी शहरात खाद्यपदार्थाचा गाडा लावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रेणुका या मुलीने महाराष्ट्राच्या दहावी परीक्षेत ९७ टक्के गुण मिळवून शाळेसह केंद्रात प्रथम क्रमांक मिळवत विजयाचा डंका वाजविला आहे. अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी
विद्यालयात शिकणाऱ्या रेणुकाच्या या उज्वल यशाचे निपाणी सह शेंडूर परिसरात कौतुक होत आहे.
दयानंद सावंत यांचे मुळगाव डोंगर कपारीतील शेंडूर हे आहे. काही वर्षांपूर्वी कामधंद्याच्या निमित्ताने ते कुटुंबासह मुंबई येथे स्थायिक होते. कालांतराने २०१७ साली त्यांनी मुंबई सोडून निपाणी गाठली. त्यांना दोन मुलीच असून त्यांच्या शिक्षणासह आपल्या व्यवसायासाच्या निमित्ताने येथील संभाजीनगरात भाड्याने घर घेतले. त्यानंतर येथील बस स्थानकासमोर खाद्यपदार्थाचा छोटासा गाडा टाकून वडापाव, भजी, पुलावा असे पदार्थ तयार करून त्याची विक्री करीत आहेत. रेणुका ही लहानपणापासूनच हुशार विद्यार्थीनी म्हणून परीक्षेत आहे. घरच्या परिस्थितीची जाण ठेवून जिद्द चिकाटीच्या जोरावर तिने घरातील छोटी मोठी कामे करत दहावीच्या पहिल्या सत्रापासूनच अभ्यासावर जोर दिला. त्याला विद्यालयाचे शिक्षकांनीही चांगली साथ दिली. त्यामुळेच तिने दहावी परीक्षेत लख्ख यश मिळवले आहे.
रेणुकाने मिळविलेल्या यशाने वडील दयानंद सावंत हे भारावून गेले आहेत. त्यांना दोन्ही मुलीच असल्या तरी मुले असल्याचे समजून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शिक्षण देण्यासाठी ते कुठेच कमी पडलेले नाहीत. आता महाविद्यालयीन शिक्षणासाठी विज्ञान विभाग निवडून वैद्यकीय सेवा करण्याची इच्छा रेणुकांनी व्यक्त केली आहे.
—
अनुराधाला ९१ टक्के गुण
दयानंद सावंत यांना दुसरीही मुलगी असून तिचे नाव अनुराधा असे आहे. तीही अभ्यासात हुशार असून आठवी मध्ये तिने ९१ टक्के गुण मिळवून सावंत कुटुंबात सरस्वतीचा सहवास असल्याचे दाखवून दिले आहे.
—
Belgaum Varta Belgaum Varta