निपाणी(वार्ता) : कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री व आमचे नेते सतीश जारकीहोळी हे मंत्री पद मिळाल्यानंतर प्रथमच निपाणी येथे मंगळवारी (ता.६) भेट देणार आहेत. दुपारी तीन वाजता येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनामध्ये निपाणी मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यातर्फे सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी केले.
काकासाहेब पाटील म्हणाले, गेल्या पंधरा वर्षापासून मंत्री जारकीहोळी हे आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. आतापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनानुसार या मतदारसंघात विविध विकास कामे केली आहेत. आता राज्यात काँग्रेसची एक हाती सत्ता आली आहे. त्यामुळे निपाणी मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार आहे. सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकारी प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या मंत्रीपदाच्या निवडीमुळे मतदार संघाचे काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण निवडणूक लढवली. त्याला मतदारसंघातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आपण या पुढील काळातही निपाणी मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे.या सत्कार समारंभात काँग्रेस कार्यकर्त्यांना मंत्री जारकीहोळी
यांचे मार्गदर्शन होणार आहे. तरी निपाणी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, निपाणी भाग काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजेश कदम, बेडकीहाळ भाग काँग्रेस कमिटी अध्यक्ष बसवराज पाटील, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर, असलम शिकलगार, अन्वर हुक्केरी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta