Wednesday , December 10 2025
Breaking News

नदी नांगरणी उपक्रमासाठी बेनाडीतील शेतकऱ्याची तयारी

Spread the love

 

पाणी टंचाईवरील पर्याय : वाहून जाणारे पाणी जीरणार जमिनीत

निपाणी (वार्ता) : गेल्या आठ दहा वर्षानंतर प्रथमच निपाणी तालुक्याला गेल्या दोन महिन्यापासून पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागले आहेत. या भागाला देण्यात येणारे काळमवाडी धरणातील पाणीही संपुष्टात आले आहे. त्यामुळे वेदगंगा आणि दूधगंगा नद्या कोरड्या पडल्या परिणामी शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरवर्षी सामोरे येणाऱ्या अशा अडचणींना तोंड देण्यासाठी नदी नांगरणी प्रकल्प उपयुक्त ठरेल, असा आशावाद व्यक्त करून बेनाडी येथील प्रगतशील शेतकरी विलास मंगावते यांनी नदी नांगरणीसाठी पुढाकार घेणार असल्याची माहिती बोलताना दिली.
दरवर्षी माती आणि वाळू थरावर थर साचून त्याचे खडकीकरण होत आहे. अर्थातच पाणी खाली न झिरपता वाहून जाते. अनेक वर्षांचा अभ्यास आणि चिंतनातून पाणी समस्येचे हे कारण लक्षात आले आहे. दरवर्षी निपाणी तालुक्यातील वेदगंगा आणि गंगा नदीला महापूर येतो. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पाणी वाहून गेल्याने फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाई निर्माण होते. त्यावर मात करण्यासाठी नागरिक, लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी आपल्या समृद्धीचा जलस्तर वाढवण्यासाठी नदी नांगरणी उपक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे. हा उपक्रम प्रत्येक गावाने राबविला तर आपले गाव, शेती पाण्याच्या समस्येतून मुक्त होईल.
नदी नांगरणी हा विषय महत्वाचा असून सर्व समाजाला उपयुक्त आहे. पाणी समस्येवर हा चांगला पर्याय आहे.
——————————————————————-
शेतकऱ्यांचे सहकार्य अपेक्षित
विलास मंगावते हे बेनाडी येथील रहिवासी असून मंगावते मळा येथे त्यांचे वास्तव्य आहे. ते कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये विविध ठिकाणी सेवा करून निवृत्त झाले आहेत. बँकेत कामकाज करतच त्यांनी आधुनिक शेतीकडे विशेष लक्ष दिले आहे. निवृत्तीनंतर ते या शेती कामामध्ये पूर्णपणे गुंतले आहेत. त्यांचा हा नदी नांगरणीचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे.
——————————————————————–

‘नदी नांगरणीमुळे पाणी जमीनीत जिरून परिसरातीला विहीरी, उपनलिका, तलाव मध्ये पाणी वाढीस मदत होणार आहे. सदर विषय साधा वाटतो, मात्र या अनुषंगाने प्रयत्न केल्यास त्याचा भरपूर लाभ सर्वांनाच होणार आहे.
सद्या वेदगंगा आणि दूधगंगा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे नदीत नांगरट करता येईल, एक प्रयोग म्हणून प्रथम आपल्या गांवातील लोकांना आवाहन करून व सदर कामास आरंभ करणे आवश्यक आहे. टप्प्याटप्प्याने सगळीकडे या उपक्रमाचा बोलबाला होईल, असे मला वाटते. प्रथमता: माझा आणि माझ्या परिसरातील शेतकऱ्यांचा सहभाग राहील. ट्रॅक्टरने नांगरणी करण्याची तयारी माझ्यासह आजूबाजूच्या शेतकऱ्यांची आहे.
– विलास मंगावते, प्रगतशील शेतकरी, बेनाडी

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांनी न्याय, हक्कासाठी अधिवेशनातील मोर्चात सहभागी व्हावे

Spread the love  राजू पोवार यांचे भावनिक आवाहन : ‘रयत’च्या पदाधिकाऱ्यांची निपाणीच बैठक निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *