
निपाणीत स्वच्छतेबाबत विरोधाभास : पावसाळ्यात पसरणार दुर्गंधी
निपाणी (वार्ता) : पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे पाऊस कधी पडेल, याचा नेम नाही. त्यापूर्वीच मॉन्सूनपूर्व तयारीच्या कामात येथील नगरपालिकेची प्रशासकीय यंत्रणा गुंततली आहे. अधिकाऱ्याकडून मान्सूनपूर्व तयारीची कामे हाती घेतल्याचे सांगितले जात आहे. तरीही शहरात काही ठिकाणी चित्र उलटेच दिसत आहे. शहरातील बेळगाव नाक्यावरील जोशी गल्लीसह परिसरातील गटारी साफसफाईचा मागमूस नाही. शिवाय कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. त्यामुळे एकीकडे स्वच्छता आणि दुसरीकडे कचऱ्याचे ढीग असा विरोधाभास निर्माण झाला आहे.
येथील नगरपालिकेमधील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपला त्यामुळे या ठिकाणी नूतन नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवडणे अपेक्षित असते. परंतु तसे झालेले नसून ही निवडणूक प्रक्रिया रखडली आहे. परिणामी निपाणी नगरपालिकेत प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. शहरातील लोकसंख्या सव्वा लाखांच्या आसपास आहे. करापोटी मोठी रक्कम पालिकेला जात आहे. मात्र शहरवासीच्या सोयी-सुविधांकडे प्रशासकांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. मॉन्सूनपूर्व तयारी करत असल्याचे नगरपालिकेतर्फे सांगितले जात असले तरीही तयारी नेमकी कुठे केली जात आहे, हे नागरिकांना कळेना झाले आहे.
शहरातील अनेक प्रभागात गटारी तुंबल्या असूनही स्वच्छता न झाल्याने पाणी वाहून जात नसल्याने दुर्गंधी पसरत आहे. याच दुर्गंधीयुक्त पाण्यात डासांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. अनेक ठिकाणच्या लहान मोठ्या गटारी कचऱ्याने भरून गेला असून उठाव झालेला नाही. त्यामुळे नगरपालिका प्रशासन खरोखरच मान्सूनपूर्व स्वच्छता सुरू केली आहे का? असा प्रश्न नागरीका मधून उपस्थित होत आहे. तरी प्रशासनाने सर्वच प्रभागात साफसफाईची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी शहरवासीनी केली आहे.
——————-–———————————————-
नाल्यांतील दूषित पाणी थेट घरात
सांडपाण्याच्या नाल्यांची स्वच्छता होणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे प्रशासकाचे दुर्लक्ष आहे. परिणामी, नाल्यांतील दूषित पाणी शहरातील नळ योजनेच्या पाइपांमध्ये शिरून पाणी घरांतील नळांमधून येत आहे. शहरातील अनेक भागात हीच स्थिती आहे. दूषित पाणी पिले जात असून, जलजन्य आजार होण्याची शक्यताही आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करून देखील त्यावर तोडगा काढला जात नसल्याचा आरोपही नागरिक करीत आहेत.
——————–———————————————-
‘बेळगाव नाका परिसरातील जोशी गल्लीमध्ये रस्त्यावर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग असले आहेत. सर्वच गटारी कचऱ्यांनी भरून गेले आहेत. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नसून त्याचा परिसरातील नागरिकांवर परिणाम होत आहे. पालिका प्रशासनाने तात्काळ स्वच्छता करावी.’
-विकास वासुदेव, नागरीक जोशी गल्ली, निपाणी
——————-–———————————————-
‘शहरातील लहान मोठ्या गटारीसह नाल्यांची टप्प्याटप्प्याने स्वच्छता केली जात आहे. पाऊस सुरू होईपर्यंत शहरातील सर्व प्रभागांच स्वच्छता होणार आहे.’
-जगदीश हुलगेज्जी, नगरपालिका आयुक्त, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta