तब्बल १९ वर्षांनंतर असा योग; अधिक मासाचा परिणाम
निपाणी (वार्ता) : यंदा मंगळवारपासून (ता.१८ जुलै) अधिक श्रावण मासाला प्रारंभ होत आहे. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे धार्मिक महत्त्व वेगवेगळे आहेत. मात्र यातील सर्वांत महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार आहे. श्रावण हा शिवपूजनासाठी महत्त्वाचा पवित्र आणि शुभ मानला जातो. हिंदू पंचांगानुसार यावर्षी श्रावण महिना सुमारे दोन महिन्यांचा असेल. श्रावण महिना १८ जुलै पासून सुरू होत असून १५ सप्टेंबर पर्यंत चालेल. म्हणजेच यावेळी एकूण ५९ दिवस श्रावण महिन्याचा लाभ भाविकांना मिळणार आहे. हा शुभ योग तब्बल १९ वर्षांनंतर घडल्याचे सांगितले जात आहे. यंदा अधिक मास आल्याने निज श्रावण सोमवारची तिथी पुढे ढकलली गेली आहे. तरीही श्रावणामध्ये एकूण आठ सोमवार येणार आहेत.
वास्तविक वैदिक दिनदर्शिके सौर महिना आणि चंद्र महिन्याच्या आधारे गणना केली जाते. चंद्र महिना ३५४ दिवसांचा असतो. आणि सौर महिना ३६५ दिवसांचा असतो. दोन्हीमध्ये सुमारे ११ दिवसांचा फरक आहे. तिसऱ्या वर्षी हा फरक ३३ दिवसांचा होतो, याला अधिक मास म्हणतात. अशा परिस्थितीत यंदा श्रावण दोन महिने चालणार आहे.
——————————————————————
पहिल्या श्रावण सोमवारी नागपंचमी
यंदा अधिक मास आहे. श्रावण मास अधिक असल्याने श्रावण अधिक मासात आलेले सोमवार न करता निज श्रावण मासातील सोमवार करावे. श्रावण निज मासात पहिला श्रावण सोमवार २१ ऑगस्ट रोजी असून, यादिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग आहे. यादिवशी चित्रा नक्षत्र राहील. चंद्र तूळ राशीत संक्रमण करेल. याच दिवशी शुभ योगात नागपंचमी देखील साजरी केली जाईल.
——————————————————————-
अधिक महिना आणि निज महिन्याचे एकूण ८ श्रावण सोमवार
*पहिला सोमवार * २४जुलै
*दुसरा सोमवार * ३१ जुलै
*तिसरा सोमवार * ७ ऑगस्ट
*चौथा सोमवार * १४ ऑगस्ट
*पाचवा सोमवार * २१ ऑगस्ट
*सहावा सोमवार * २८ ऑगस्ट
*सातवा सोमवार * ४ सप्टेंबर
*आठवा सोमवार * ११ सप्टेंबर