राजेंद्र वडर यांचा आरोप; अधिकारी, ठेकेदारांचे संगनमत
निपाणी (वार्ता) : भीमापूरवाडी गावाला २०१६-१७ साली सुवर्णं ग्राम योजनेत निवड करून पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले. या कामामुळे गावाचा सर्वांगीण विकास होणार असे वाटत असताना संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्या संगणमताने कामात आर्थिक व्यवहार करून काम अपूर्ण करण्यात आले आहे, असा आरोप माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर पवार यांनी केले. ते गळतगा येथे आयोजित पत्रकार बैठकीत बोलत होते.
राजेंद्र वडर म्हणाले, कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असताना पाच हजार च्या आत लोकसंख्या असलेली गावे सुवर्णं ग्राम योजनेत निवड करून त्यांचा विकास करण्याचे धोरण तात्कालिक मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आखले. त्यावेळी आपण भोज जिल्हा पंचायत सदस्य म्हणून कार्यरत होतो. त्यावेळी जिल्हा पंचायत बैठकीत आपल्या मतदार संघात असलेल्या भीमापूरवाडी गांव येत असल्याने सुवर्णं ग्राम योजनेत भीमापूरवाडीची निवड करावी,असा आग्रह त्यावेळचे सीएस के. व्ही. राजेंद्र यांच्याकडे धरला. त्यासाठी माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री विरकुमार पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनीही या गोष्टीचा पाठपुरावा केला. आमदार सतीश जारकिहोळी यांनी भीमापूरवाडीची निवड सुवर्णं ग्राम योजनेत निवड केली. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भीमापूरवाडीसाठी पाच कोटी रुपये मंजूर केले. या रक्कमेतून मंजूर करण्यात आलेले कामे करण्यात आलेली नाहीत. त्यासाठी ठेकेदार आणि संबंधित अधिकारी वर्गाने संगणमत करून आर्थिक व्यवहार करून काम निकृष्ठ पद्धतीचे केले आहे.
भीमापूरवाडीत करण्यात आलेली सर्व कामे अर्धवट स्थितीत आहेत. व्यायाम शाळा बांधण्यात आले आहे. पण त्यामध्ये व्यायाम साहित्य नाही. त्यामुळे व्यायाम शाळा असून अडचण नसून खोळंबा असेच बनले आहे. निधीतून गावात सर्वत्र सोलार बसविण्यात येणार होते. पण काही ठिकाणी वगळता गावात अद्याप सोलार बसविण्यात आलेले नाहीत. गावात गटार तयार करण्यात आले आहे. पण काही ठिकाणी अजून गटारी करणे बाकी आहे. याशिवाय अनेक कामे निकृष्ठ तर काही कामे अर्धवट आहेत. पाच कोटी रुपयाचे व्याज ५ लाख ७० हजार ९२० रुपये जमा झाले आहे. त्यासाठी सदर रक्कम भीमापूरवाडीचे असून ते भीमापूरवाडी साठीच खर्च करण्याची मागणी केली असता अधिकाऱ्यांनी सदर रक्कम सरकारला परत करावे लागणार असल्याचे सांगितले आहे. पण ही रक्कम भीमापूरवाडीलाच खर्च करण्यासाठी आपण आग्रह धरल्याचे वडर यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta