वस्त्रोद्योग मंत्री शिवानंद पाटील यांचा आदेश; वस्त्रोद्योग व्यवसायिकातून समाधान
निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र राज्यातील इचलकरंजी या वस्त्रोद्योग नगरीच्या धर्तीवर बोरगाव येथे मोठे टेक्सटाईल पार्क उभारण्यात आले आहे. या टेक्स्टाईल पार्कमधील उद्योग धारकांच्या अनेक समस्या आहेत. या समस्या त्वरित मार्गी लावून त्यांना उद्योग निर्मितीसाठी मुभा मिळवून द्या, असा आदेश वस्त्रोद्योग आयुक्तांना वस्त्रोद्योग मंत्री शिवानंद पाटील यांनी तातडीने दिल्याने येथील उद्योग धारकांना दिलासा मिळाला आहे. बोरगाव येथे अनेक टेक्सटाईल धारकांनी वस्त्रोद्योग मंत्री शिवानंद पाटील यांची बंगळूर विधानसभा येथे भेट घेऊन पार्क मधील अनेक समस्यांबाबत चर्चा केली. त्यावेळी मंत्री पाटील यांनी हा आदेश दिला आहे.
याबाबत बोलताना माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार यांनी, बोरगाव टेक्स्टाईल पार्क येथे सुमारे १० पेक्षा अधिक एयर जेट लूम धारक आहेत. त्यांना विज बिल भरण्यासाठी सबसिडी मिळण्यासाठी मागणी करण्यात आली होती. वीज बिलात सबसिडीसाठी वस्त्रोद्योग खात्याकडून बारा कोटींवर अधिक अनुदान राखीव असले तरीही वस्त्रोद्योग आयुक्त मात्र हे अनुदान देण्यासाठी टाळाटाळ करीत होते.
मागील भाजप काळातही याबाबतीचे निवेदन वस्त्रोद्योग मंत्र्यांना देण्यात आले होते. पण अजूनही याबाबत विचार झालेला नसल्यामुळे या ठिकाणी वस्त्रोद्योग मंत्र्यांची भेट घेऊन बोरगाव टेक्स्टाईल पार्कमधील अनेक समस्यांबाबत चर्चा केली. विज बिल भरण्यात सबसिडी मिळत नसल्याने अनेकांनी उद्योग, व्यवसाय बंद केले आहेत. कोट्यवधी रुपयांची बँकेकडून कर्ज घेऊन यशश कारखाना उभे केले आहेत. सबसिडी बरोबरच अनेक समस्या असल्याने या ठिकाणी उद्योगधंदे चालवणे अवघड बनले आहे. असा प्रश्न मंत्र्यांसमोर उपस्थित केला असता त्यानी तातडीने वस्त्रोद्योग आयुक्तांना दूरध्वनीवरून संपर्क साधून बोरगाव टेक्स्टाईल पार्क मधील सर्वच समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करुन आपणास माहिती द्यावी, असा आदेश दिला आहे. विज बिल भरण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले अनुदान आता थेट टेक्स्टाईल धारकांच्या खात्यावर जमा होणार असल्याने थोडा दिलासा मिळाला असून यासाठी माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे विशेष सहकार्य मिळाल्याचे यावेळी राजेंद्र पवार यांनी सांगितले.
याप्रसंगी मागासवर्गीय व्यवसायिक संघाचे उपाध्यक्ष अशोक लिंबावळी, टेक्स्टाईल धारक रमेश गवारी, शंकरदादा पाटील, अमोल लाटणे आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta