कोगनोळी : कोगनोळीचा आठवडी बाजार प्रत्येक शुक्रवारी असतो. या बाजारामध्ये सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ के.एस, हणबरवाडी, दत्तवाडी, सुळकूड, आडी, बेनाडी, आप्पाचीवाडी आदी भागातील व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेऊन विक्रीसाठी येत असतात. पंधरा हजारावर लोकसंख्या असलेल्या कोगनोळी आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी करण्यासाठी येत असतात. येथे दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत बाजार भरतो. आज बाजारच्या वेळेतच पावसाने हजेरी लावली. अशा पावसातच भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. एका हातात छत्री आणि एका हातात पिशवी असे चित्र सर्वत्र पहावयास मिळत होते. व्यापाऱ्यांनी पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत मारले होते. आजच्या बाजारात सर्वच दर तेजीत होते. पावसातच बाजाराला उधाण आल्याचे चित्र पहावयास मिळत होते.